मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे आखाती प्रदेशात तणावाची तीव्रता वाढली असून त्याचे थेट परिणाम महाराष्ट्रातील नागरिकांवर होत आहेत. महारा

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे आखाती प्रदेशात तणावाची तीव्रता वाढली असून त्याचे थेट परिणाम महाराष्ट्रातील नागरिकांवर होत आहेत. महाराष्ट्रातील पर्यटक, विद्यार्थी, भाविक आणि नोकरीसाठी परदेशात गेलेल्या नागरिकांना बसला आहे. विशेषतः दुबईसह इतर आखाती शहरांमध्ये अनेकजण अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाल्याने परतीच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. अनेक विमान कंपन्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव उड्डाणे रद्द केली किंवा पुढे ढकलली आहेत.
पर्यटन क्षेत्रावरही या घडामोडींचा मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील बहुतांश परदेश दौर्यांच्या नोंदी रद्द झाल्याचे पर्यटन व्यावसायिक सांगत आहेत. भीतीच्या वातावरणामुळे नव्या बुकिंगमध्येही मोठी घट झाली आहे. विमानसेवा खंडित झाल्याने हजारो प्रवासी अनिश्चिततेत अडकले आहेत. मक्केला धार्मिक यात्रेसाठी गेलेले नाशिक येथील सुमारे दोनशे भाविक सध्या परतीच्या प्रतीक्षेत आहेत. जिद्दा येथील विमानतळ बंद असल्याने त्यांना परतणे शक्य झालेले नाही. त्याचप्रमाणे विमा कंपनीच्या कार्यक्रमासाठी गेलेले काही नागरिक, तसेच विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी गेलेले विद्यार्थी दुबईत थांबले आहेत. काही ठिकाणी वीजपुरवठा आणि दळणवळण यंत्रणा विस्कळीत झाल्याने संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याचे नातेवाईक सांगत आहेत. स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही निर्बंध लागू केले असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे तेथील भारतीय नागरिकांनी कळवले असले, तरी अनिश्चिततेचे सावट कायम आहे.
देशभरात गृह मंत्रालयाकडून अलर्ट जारी
नवी दिल्ली : पश्चिम आशियात वाढलेल्या संघर्षामुळे देशांतर्गत परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना पाठवलेल्या पत्राद्वारे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः धार्मिक सभा, सार्वजनिक कार्यक्रम किंवा भाषणांमध्ये परदेशातील घटनांचा उल्लेख झाल्यास वातावरण तापण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 28 फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या पत्रात मंत्रालयाने राज्य सरकारांना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सांगितले आहे. अशांतता पसरवू शकणार्या व्यक्ती आणि गटांवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः इराण समर्थक कट्टर प्रवचनकारांकडून भडकाऊ भाषणे होऊ शकतात, ज्यामुळे सांप्रदायिक भावना भडकण्याची शक्यता आहे, असा इशाराही देण्यात आला आहे. केंद्राने गुप्तचर यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. संभाव्य तणावाच्या परिस्थितीत त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवणे आवश्यक असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. खाडी देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक वास्तव्य करत असल्याने केंद्र सरकारने संयम बाळगण्याचे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. सरकार भू-राजकीय घडामोडींसह त्याच्या देशांतर्गत परिणामांचाही आढावा घेत असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. दरम्यान, जम्मू आणि काश्मीर मधील काही भागांत आधीच खबरदारीचे उपाय लागू करण्यात आले आहेत.

COMMENTS