Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुत्रकामेष्टी यज्ञातून अवतरले श्रीराम : ह.भ.प. योगेश महाराज नेरलकर यांचे प्रभावी कीर्तन; हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये साई गणेश मंदिरात पार पडला श्रीराम जन्मोत्सव

नांदेड : ज्ञानाने मिळणारे कैवल्य हे भक्ती आणि कर्माशिवाय अपूर्ण आहे. कलियुगात अहंकार त्यागून संतांच्या मार्गदर्शनाखाली केलेले नामस्मरण हाच भगवंतप

राष्ट्रीय महामार्गाच्या अतिक्रमण विरोधी विभागचे अंबाई हॉटेला बुलडोझर लावले; आठ दिवसांत आसना ते अर्धापूर तालुक्याची हद्द अतिक्रमण मुक्त करू- राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी
अफवांना पूर्णविराम : नांदेड जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा; नागरिकांनी घाबरू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
ज्येष्ठांना न्याय द्या, अन्यथा आंदोलन-डॉ. हंसराज वैद्य

नांदेड : ज्ञानाने मिळणारे कैवल्य हे भक्ती आणि कर्माशिवाय अपूर्ण आहे. कलियुगात अहंकार त्यागून संतांच्या मार्गदर्शनाखाली केलेले नामस्मरण हाच भगवंतप्राप्तीचा खरा मार्ग आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. योगेश महाराज नेरलकर यांनी श्रीराम जन्म किर्तन प्रसंगी केले.
राधिकानगर येथील साई गणेश मंदिरात श्रीराम जन्मोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दुपारी बारा वाजता पार पडला. यावेळी नेरलकर बंधूंच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.  संत दासगणू महाराजांच्या अभंगांच्या आधारे निर्गुण-सगुण तत्त्व स्पष्ट करताना निर्गुणाचा सगुण झाला एक भक्तासाठी या विचारातून त्यांनी भक्तीची महानता अधोरेखित केली. भक्तीमुळेच परमेश्वर साकार रूप धारण करतो, असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले ऐश्वर्य नाकारून संत तुकाराम महाराजांनी भौतिकतेची निरर्थकता अधोरेखित केली, हा प्रसंग त्यांनी विशेषत्वाने मांडला. ज्ञानाने मिळणारे कैवल्य हे भक्ती आणि कर्माच्या जोडीशिवाय अपूर्ण आहे. कलियुगात अहंकार सोडून, संतांच्या मार्गदर्शनाने केलेले नामस्मरण आणि सत्संग हाच निर्गुण भगवंताला सगुण रूपात अनुभवण्याचा एकमेव मार्ग आहे.पुंडलिकाच्या आख्यानाचा संदर्भ देत ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’ या गजराचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. भगवंताने पुंडलिकाला दिलेल्या वचनामुळे भक्तीला संतांच्या कृपेची ‘सही’ आवश्यक असते, असे ते म्हणाले.  आपले वडील प्रख्यात कीर्तनकार स्वर्गीय ह.भ.प. शरद महाराज यांच्याकडून लाभलेला कीर्तनपरंपरेचा वारसा पुढे नेत असल्याचे त्यांनी नम्रपणे नमूद केले. खलांची व्यंकटी सांडो या ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील ओवीत अंतःकरणातील परिवर्तनाचा संदेश आहे, तर परित्राणाय साधुनां या भगवद्गीतेतील उक्ती अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देते, असा सूक्ष्म भेद त्यांनी उलगडला. रामायणातील श्रीराम जन्माची दिव्य कथा उलगडताना त्यांनी रामावतारामागील दैवी पूर्वयोजना स्पष्ट केली. रावणाच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या पृथ्वीमाता व देवगणांनी भगवान विष्णूंना केलेल्या आर्त विनंतीनंतर धर्मसंस्थापनेसाठी अवतार घेण्याचा संकल्प झाला. अयोध्येचे राजा दशरथ यांना पुत्रप्राप्ती नसल्याने वशिष्ठ मुनींच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यात आला. ऋषीश्रृंगांच्या पवित्र हस्ते संपन्न झालेल्या या यज्ञातून यज्ञदेवता प्रकट होऊन सुवर्णकलशातील पायस दशरथांना अर्पण करण्यात आले. हा दिव्य प्रसाद कौसल्या, कैकयी आणि सुमित्रा यांना दिल्यानंतर विश्वकल्याणाची बीजे रोवली गेली. चैत्र शुद्ध नवमीच्या पवित्र तिथीला कौसल्या मातेच्या उदरातून श्रीरामांचा अवतार झाला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्म हा धर्म, मर्यादा आणि आदर्श जीवनमूल्यांचा साक्षात अवतार असल्याचे त्यांनी ओघवत्या शब्दांत सांगितले. या कीर्तनासाठी संवादिनीवर मंगेश जवळेकर व तबल्याची साथसंगत प्रशांत गाजरे यांनी दिली. वनमाला कुलकर्णी यांनी श्रीराम जन्माचा पाळणा सुश्राव्य आवाजात गायिला. या कीर्तन-संकीर्तनातून सत्संग, भक्ती आणि नामस्मरण यांचे महत्त्व अधोरेखित झाले. भक्ती, संतसंग आणि नामस्मरण यांच्या संगमातूनच मुक्तीकडे जाणारा मार्ग खुला होतो, असा निष्कर्ष व्यक्त करण्यात आला. उपस्थित भाविकांनी या प्रवचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

COMMENTS