भोकर : भोकर तालुक्यातील मौजे नारवट परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे

भोकर : भोकर तालुक्यातील मौजे नारवट परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतशिवारात बिबट्याचे दर्शन होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, त्यामुळे शेतात जाणार्या शेतकर्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नारवट परिसरातील विविध शेतांमध्ये बिबट्या दिसल्याची चर्चा असून, काही ग्रामस्थांनी त्याच्या हालचाली पाहिल्याचे सांगितले आहे. विशेषतः सायंकाळनंतर आणि रात्रीच्या वेळी शेतात जाणे शेतकर्यांसाठी धोकादायक ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पिकांची निगा राखण्यासाठी शेतकर्यांना रात्रीच्या वेळी शेतात जावे लागते. मात्र, बिबट्याच्या वावराच्या चर्चेमुळे शेतकरी एकट्याने शेतात जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळत असताना वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून वस्तुस्थितीची खात्री करणे अपेक्षित आहे. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना देणे आणि संवेदनशील भागात वनकर्मचार्यांची गस्त वाढविणे गरजेचे आहे. मात्र, अद्याप वनविभागाकडून अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. बिबट्याचा वावर केवळ चर्चेपुरता आहे की प्रत्यक्षात त्याची उपस्थिती आहे, याबाबत वनविभागाने तातडीने स्पष्टता करावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे. नारवट परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती खरी ठरल्यास भविष्यात मनुष्य किंवा पशुधनावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आताच प्रतिबंधात्मक पावले उचलण्याची गरज आहे.वनविभागाने तातडीने नारवट परिसराची पाहणी करून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घ्यावा, आवश्यक असल्यास कॅमेरा ट्रॅप लावावेत, रात्रीची गस्त वाढवावी आणि ग्रामस्थांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. ‘वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्यापेक्षा आधी नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करा,’ अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली असून, वनविभाग आता याकडे किती गांभीर्याने पाहतो, याकडे नारवटवासीयांचे लक्ष लागले आहे

COMMENTS