अकोले : तालुक्यातील वाघापूर येथे शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केले. प्रसंगावधान रा
अकोले : तालुक्यातील वाघापूर येथे शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केले. प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्याने ग्रामस्थ धावून आल्यामुळे महिलेचा जीव थोडक्यात बचावला.
अनिता सचिन रकटे (वय ३५) या शुक्रवारी सायंकाळी घरालगतच्या शेतात गाई व शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याने पंजाचे वार करत जबड्याने चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. झटापटीदरम्यान त्यांच्या उजव्या हाताला खोल जखम झाली, तर डाव्या हातावर व डोक्यावरही पंजाचे घाव बसले.
हल्ल्यादरम्यान अनिता रकटे यांनी आरडाओरडा केल्याने शेतातील मजूर आणि ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावून आले. नागरिकांची चाहूल लागताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र, तोपर्यंत झालेल्या हल्ल्यात रकटे यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.
ग्रामस्थांनी त्यांना तातडीने अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना संगमनेर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS