Homeताज्या बातम्या

विश्वचषकात इंग्लंडची विजयी सलामी; घानाचाही थरारक विजय

नवी दिल्ली : फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेत इंग्लंडने दमदार सुरुवात करत क्रोएशियाचा ४-२ असा पराभव केला. कर्णधार हॅरी केनच्या शानदार दुहेरी गोलच्या

नाडाकडून यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्माला नोटीस
मेस्सीचा ऐतिहासिक हॅट्ट्रिक; अर्जेंटिनाचा अल्जेरियावर ३-० विजय
फुटबॉल विश्वचषक स्पर्धा: अमेरिकेचा पराग्वेवर ४-१ असा दणदणीत विजय; फॉलारिन बालोगुनची दुहेरी गोलधडक

नवी दिल्ली : फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेत इंग्लंडने दमदार सुरुवात करत क्रोएशियाचा ४-२ असा पराभव केला. कर्णधार हॅरी केनच्या शानदार दुहेरी गोलच्या जोरावर इंग्लंडने हा विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात घानाने अखेरच्या क्षणी गोल करत पनामावर १-० अशी मात केली.

इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यातील सामना अत्यंत रंगतदार ठरला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत २-२ अशी बरोबरी साधली होती. मात्र, दुसऱ्या सत्रात इंग्लंडने अधिक प्रभावी कामगिरी करत दोन गोलची भर घातली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. सामन्यात हॅरी केनने पहिला गोल दंडप्रहारातून (पेनल्टी) केला. सुरुवातीला त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता, परंतु दृश्य परीक्षणानंतर (VAR – व्हिडिओ असिस्टंट रेफ्री) प्रतिस्पर्धी गोलरक्षकाने नियमभंग केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला पुन्हा संधी देण्यात आली. त्यानंतर केनने अचूक फटका मारत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर त्याने कोपरा फटक्यावर (कॉर्नर किक) मिळालेल्या चेंडूला मस्तकाने (हेडर) दिशा देत आणखी एक गोल केला. या कामगिरीमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील गोलची संख्या ८१ वर पोहोचली. तसेच विश्वचषकातील त्याच्या गोलची संख्या १० झाली असून इंग्लंडसाठी विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने गॅरी लाईनकरची बरोबरी केली.

इंग्लंडकडून ज्युड बेलिंगहॅम आणि मार्कस रॅशफोर्ड यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. तर क्रोएशियासाठी मार्टिन बटुरिना आणि पीटर मुसा यांनी गोल केले. सामन्याच्या उत्तरार्धात बेलिंगहॅमच्या अचूक फटक्याने इंग्लंडला आघाडी मिळाली, तर अखेरच्या टप्प्यात रॅशफोर्डने गोल करत विजय निश्चित केला.

दुसऱ्या सामन्यात घाना आणि पनामा यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. संपूर्ण सामना गोलशून्य राहिल्यानंतर अतिरिक्त वेळेत केलब यिरेनकाईने निर्णायक गोल करत घानाला विजय मिळवून दिला. ब्रँडन थॉमस असांतेच्या पासवर त्याने अचूक फटका मारत संघाला महत्त्वाचे तीन गुण मिळवून दिले. पराभवानंतर पनामाचे बरोबरी साधण्यासाठी सर्व शक्तीनिशी आक्रमण केले, मात्र घानाच्या बचावफळीने त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरवले. या विजयामुळे घानाचा पुढील फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग अधिक सुकर झाला असून २०१० नंतर प्रथमच बाद फेरी (नॉकआउट) गाठण्याची आशा बळावली आहे.

COMMENTS