Homeताज्या बातम्या

मुदखेडचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांना ‘सैनिक रत्न पुरस्कार’; मुंबईत कारगिल विजय दिनानिमित्त विशेष सन्मान

नांदेड: मराठवाडा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष तथा मुदखेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांना प्रतिष्ठित 'सैनिक रत्न पुरस्कार' प्रदान करण

राज्यात TET चा पेपर फुटला; परीक्षा रद्द करण्याची नामुष्की, भिवंडीतून तिघांना घेतले ताब्यात
बारामतीत अजितदादांच्या पुतळ्याचे लोकार्पण; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अनावरण
जयघोषात दुमदुमला परिसर! जगदंबा विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी उत्साहात
माजी सैनिक लक्ष्मण देवदे यांना सैनिक रत्न पुरस्कार – Todayonelive

नांदेड: मराठवाडा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष तथा मुदखेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांना प्रतिष्ठित ‘सैनिक रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून २६ जुलै रोजी मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत प्रामुख्याने उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील माजी सैनिक लक्ष्मण देवदे यांनी सैन्यातील सेवेदरम्यान दिलेले योगदान तसेच त्यांची सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेऊन सैनिक फेडरेशनच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्यासह सुभेदार दरेकर, ज्ञानेश्वर डुमणे आणि इतर ज्येष्ठ माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लक्ष्मण देवदे यांनी सैन्यात असताना अत्यंत कठीण व दुर्गम भागात देशसेवा बजावली आहे. त्यांनी आसाम, मिझोराम, नागालँड, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या संवेदनशील भागात सेवा दिली. पंजाबमधील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ तसेच श्रीलंकेतील भारतीय शांती सेनेत दोन वर्षे त्यांनी कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावले असून, १९९७ मध्ये ते भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झाले.

सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी व्यवसाय, राजकारण आणि समाजकारणात सक्रिय सहभाग घेतला. मुदखेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष, गटनेते, बांधकाम सभापती, पाणीपुरवठा सभापती, आरोग्य व शिक्षण सभापती अशी विविध पदे त्यांनी यशस्वीपणे भूषवली आहेत. सध्या ते मुदखेड येथील प्रसिद्ध खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. देशसेवा आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना हा ‘सैनिक रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.

COMMENTS