नवी दिल्ली : लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. काँग्रेसच्या खासदार प्
नवी दिल्ली : लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाई, शिक्षण क्षेत्रातील अर्थसंकल्पीय तरतुदी आणि नव्या शिक्षणमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहात मोठा गदारोळ निर्माण झाला. त्यांच्या विधानांवर सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत माफीची तसेच संबंधित वक्तव्य सभागृहाच्या कामकाजातून वगळण्याची मागणी केली.
विधेयकावरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. अर्थसंकल्पात शिक्षणासाठीची आर्थिक तरतूद अपुरी असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याची टीका केली. शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा केवळ विधेयकांमधून नव्हे, तर पुरेशा निधी आणि प्रभावी धोरणांमधून होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रियांका गांधी यांनी माजी शिक्षणमंत्र्यांच्या कार्यशैलीवरही टीका केली. त्यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या स्वागत समारंभाचा उल्लेख करत सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना आणि देशातील शैक्षणिक प्रश्नांपेक्षा राजकीय संदेश देण्याला अधिक महत्त्व दिल्याचा आरोप त्यांनी केला.
भाषणादरम्यान प्रियांका गांधी यांनी नव्या शिक्षणमंत्र्यांबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप केले. एका बलात्कार करणार्यांच्या सुटकेवर सहमती व्यक्त करणार्या व्यक्तीला शिक्षणमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले, अशी टिप्पणी त्यांनी केली. या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या बाकांवरून गदारोळ झाला. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधार्यांच्या आक्षेपांना काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले. प्रियांका गांधी यांनी आपण केलेल्या विधानांबाबत आवश्यक पुरावे सादर करण्याची तयारी दर्शवली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी यापूर्वी विविध नेत्यांच्या वादग्रस्त विधानांची नोंद सभागृहाच्या कामकाजातून हटविण्यात आलेली नसल्याचा दाखला देत केवळ विरोधी पक्षाच्या सदस्यांवरच कारवाई केली जात असल्याचा आरोप केला.
दरम्यान, प्रियांका गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत पोलिसांनी केलेल्या कथित लाठीमार, अश्रुधूराचा वापर आणि इतर बळाचा वापर याबाबत सरकारला थेट प्रश्न विचारले. आंदोलन करणारे विद्यार्थी दहशतवादी नव्हते, मग त्यांच्यावर इतक्या कठोर पद्धतीने कारवाई का करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा कारवाईचे आदेश नेमके कुणी दिले, याचे उत्तर सरकारने देशाला द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सभागृहातील वाढता गोंधळ लक्षात घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना मूळ विधेयकावरील चर्चेपुरतेच मर्यादित राहण्याचे निर्देश दिले.
खा. प्रियांका गांधींनी माफी मागावी : मंत्री रिजिजू
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रियांका गांधी यांनी केलेले आरोप वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचा दावा केला. त्यांनी संबंधित विधान सभागृहाच्या अधिकृत नोंदीतून वगळण्याची तसेच प्रियांका गांधी यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली. नव्या शिक्षणमंत्र्यांनीही या आरोपांवर नाराजी व्यक्त करत चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला आणि आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली.

COMMENTS