Homeमुंबई - ठाणे

पंढरपूर कॉरिडॉरचे काम योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न

पंढरपूर: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसराच्या व

नांदेडमध्ये ‘जवाब दो महामोर्चा’; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
नांदेडच्या कायदा-सुव्यवस्थेची धुरा ’सिंघम’च्या हाती; गुन्हेगारांबरोबरच राजकीय दबावालाही द्यावी लागणार टक्कर!
डॉ. प्रतीभा थोरात यांची शिंदेसेनेच्या महिला सेना प्रभारी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती; केज आणि परळीची जबाबदारी

पंढरपूर: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसराच्या विकासाचे काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती बाबासाहेब माने या दांपत्यासमवेत केली. यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने झालेल्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब पाठारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

मागील काळात सुरू केलेले मंदिर विकासाचे काम बहुतांश पूर्ण झाल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो लोक येतात. येथे अत्यंत कमी जागा आहे. आता मोठी जागा तयार करणे गरजेचे आहे. यावर्षी हे काम सुरू करायचे आहे. कॉरिडॉर विकासात येथील व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना घरे मिळतील, भाडेकरूंची व्यवस्था होईल, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी होईल.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, यंदा वारीने एक नवा उच्चांक गाठला आहे. यावर्षी २५ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची दर्शनासाठी रांग लागली होती. परंतु दर्शनासाठी २५ तास लागले तरीही कोणीही नाराज न होता, न थकता त्या ठिकाणी आनंदाने विठ्ठल नामाचा गजर करत हे दर्शन घेत आहेत. चंद्रभागेचे पाणी स्वच्छ राहील याची काळजी घेण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी वाळवंटात अतिशय सुंदर व्यवस्था केल्यामुळे तिथला कचरा, विष्ठा आदी संपूर्ण स्वच्छता झाली आहे. त्यामुळे अतिशय सुंदर वाळवंट आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. आपण सर्वजण करत असलेली सेवा श्री विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव मिळेल, अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करतो.

यंदा वारीत येणारा वारकरी हा शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, उद्योजक अशा सर्व क्षेत्रांतील आहे. विठूरायाची सेवा जरी आपल्याला करता आली नाही, तरी वारकऱ्यांची, शेतकऱ्यांची सेवा केली तरी ती सेवा विठूरायापर्यंत पोहोचते. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन व्हावे, यासाठी ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आणि थकबाकी वीजबिले माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त वारी, वृक्षसंवर्धन आदी विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूर, द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान, जालना आणि तृतीय क्रमांक गोऱ्हेकर संस्था, आळंदी देवाची यांना पुरस्कार व धनादेश देऊन गौरवण्यात आले.

COMMENTS