देवळाली प्रवरा : आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात विठ्ठल भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि सुरक्षित सायकलिंगचा संदेश समाजापर्

देवळाली प्रवरा : आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात विठ्ठल भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि सुरक्षित सायकलिंगचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा अनोखा उपक्रम देवळाली प्रवरा सायकलिंग अँड ट्रेकिंग ग्रुपच्या वतीने राबविण्यात येत आहे. ग्रुपतर्फे १० ते १२ जुलै २०२६ दरम्यान पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले असून, या वारीत २५ सायकलपटू सहभागी होणार आहेत.या सायकल वारीचा शुभारंभ १० जुलै रोजी पहाटे ४ वाजता देवळाली डेपो येथून मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून, देवळाली प्रवरा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचा विशेष सहभाग असणार आहे. ग्रुपचे अध्यक्ष संभाजी वाळके आणि उपाध्यक्ष राहुल दुधाडे यांच्या नेतृत्वाखाली ही वारी पार पडणार आहे.देवळाली प्रवरा, राहुरी, अहिल्यानगर, मिरजगाव, करमाळा आणि टेंभुर्णी मार्गे सायकलपटू पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. आयोजकांच्या मते, ही वारी केवळ पंढरपूर दर्शनापुरती मर्यादित नसून फिटनेस, पर्यावरण संवर्धन, सामाजिक ऐक्य आणि विठ्ठल भक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा तिचा मुख्य उद्देश आहे. सायकलिंगमुळे निरोगी जीवनशैली, इंधन बचत आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा संदेशही समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे.१२ जुलै रोजी पंढरपूर येथे महाराष्ट्रभरातून येणाऱ्या सुमारे दहा हजार सायकल वारकऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी सहा वाजता भव्य सायकल रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर रिंगण सोहळा आणि सायकलस्वारांचे राज्यस्तरीय संमेलन होणार आहे. या उपक्रमासाठी नगराध्यक्ष सत्यजित कदम, नगरसेवक प्रकाश संसारे, सतीश वाळुंज, ऋषभ लोढा, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, दीपक त्रिभुवन तसेच अहिल्यानगर येथील बाईक टेक पॉईंटचे संभाजी मोहिते यांचे सहकार्य लाभत आहे.

COMMENTS