नायगाव: दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्

नायगाव: दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी नायगाव तालुक्यातील नरसी व नायगाव शहरात वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना तसेच समाजवादी पक्षाने पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदविला. व्यापार्यांनीही स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्र बंदला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत नायगाव शहरातील हेडगेवार चौकात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याचप्रमाणे नरसी शहरातही कडकडीत बंद पाळण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च पातळीवर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणार्या संबंधित पोलीस अधिकार्यांवर गुन्हे दाखल करावेत, आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशा विविध मागण्यांचे निवेदन नायगाव तहसीलदार यांना सादर केले.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगवानराव अचोलीकर, माजी तालुकाध्यक्ष साहेबराव कोपरेकर, माजी शहराध्यक्ष सतीश वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते कपिल डुमणे, माजी जिल्हा उपाध्यक्ष दीपक गजभारे, साईनाथ जिगळेकर, रंजीत देशमुख, बालाजी गायकवाड, विश्वंभर कांबळे, श्याम गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नरसी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) विक्रम हराळे यांच्या नेतृत्वाखाली, तर नायगाव शहरात पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

COMMENTS