नांदेड :प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून समाजाला मूलभूत हक्क दिले. सामाजिक व आर्थिक समत

नांदेड :
प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून समाजाला मूलभूत हक्क दिले. सामाजिक व आर्थिक समतेची पायाभरणी करत त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा अधिकारही दिला. संविधानातील या मूल्यांची प्रभावी अंमलबजावणी तळागाळापर्यंत करणे, हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, डी.बी. गिरी, अमित राठोड, मयूरकुमार आंदेलवाड, प्रशांत थोरात, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, नियोजन शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे, अवधूत गंजेवार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, अशोक भोजराज, संजय शिंदे, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, लेखाधिकारी निळकंठ पांचगे, विशाल हिवरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना कावली म्हणाल्या की, अधिकारी व कर्मचार्यांनी आपल्या कार्यातून संविधानातील न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांची जपणूक करावी. गावपातळीवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहणे आवश्यक आहे. बाबासाहेबांची जयंती केवळ औपचारिक स्वरूपात न साजरी करता त्यांच्या विचारांची अंमलबजावणी दैनंदिन कामकाजातून व्हावी. तरुणांनी बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी त्यांचे साहित्य वाचून चिंतन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मेघना कावली यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लेखाधिकारी निळकंठ पांचगे यांनी आपले संविधान – आपला स्वाभिमान या विषयावर मार्गदर्शन करत संविधान निर्मितीचा प्रवास उलगडून सांगितला. प्रत्येक घरात संविधान असावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मिलिंद व्यवहारे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, सकाळी जिल्हा परिषदेच्या परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भव्य पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

COMMENTS