नांदेड :भगवान परशुराम यांच्या 19 एप्रिल रोजी होणार्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परशुराम चौकाच्या दयनीय अवस्थेबाबत संतापाची लाट उसळली आहे.
नांदेड :
भगवान परशुराम यांच्या 19 एप्रिल रोजी होणार्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परशुराम चौकाच्या दयनीय अवस्थेबाबत संतापाची लाट उसळली आहे. ब्राह्मण समाजाचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या या चौकात दरवर्षी जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र येतात व विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा जयंती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही चौकाची अवस्था अत्यंत खराब असून स्वच्छता, देखभाल व सुशोभीकरणाचा पूर्णतः अभाव दिसून येत आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत महानगरपालिकेवर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. परशुराम जयंतीच्या पूर्वी या चौकाची दुरुस्ती व सुशोभीकरण करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, या विषयावर अनेक वेळा महापालिका प्रशासनाशी संपर्क साधून पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. इतकेच नव्हे, तर महापालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. लातूरकर पुढे म्हणाले की, परशुराम जयंती हा ब्राह्मण समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून या दिवशी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने ब्रह्मबांधव परशुराम चौकात एकत्र येतात. अशा वेळी चौकाची सध्याची दुरवस्था ही केवळ प्रशासनाच्या उदासीनतेचे प्रतीक असून समाजाच्या भावना दुखावणारी आहे. चौक परिसरात कचरा, तुटलेली रचना, अस्वच्छता व दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत असल्याने जयंतीच्या कार्यक्रमावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेकडे अनेक वेळा पाठपुरावा केला असूनही आयुक्तांची प्रत्यक्ष भेट तर सोडा ते फोन सुद्धा उचलत नाहीत अशी परिस्थिती आहे. आयुक्त डॉ. महेशकमार डोईफोडे यांनी लातूरकर यांचा कॉल उचलून किमान मागणी कोणती आहे हे तरी ऐकून घ्यावे अशी अपेक्षा निखिल लातूरकर यांनी निवेदनात व्यक्त केली आहे. सध्या महापालिकेत भाजपचे सरकार असताना हिंदूंचा एक मोठा सण असलेल्या परशुराम जयंतीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. महानगरपालिकेत सध्या सत्ताधारी असलेल्या पक्षाने हिंदू सणांविषयी संवेदनशीलता दाखवणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांसारखे वरिष्ठ नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित राहतात, तरीही चौकाची स्थिती सुधारण्यात आलेली नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली. परशुराम चौकाची दुरावस्था हा ब्राह्मण समाजासाठी चिंतेचा विषय झाला आहे. परशुराम जयंतीपूर्वी तातडीने चौकाचे स्वच्छता, दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम हाती घ्यावे आणि भाविकांसाठी सुयोग्य व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निखिल लातूरकर यांनी दिला आहे.

COMMENTS