Homeताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत; महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटीसाठी हालचाली वेगवान केल्या असून, पक्षातील विविध

कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवतात – अ‍ॅड.मनोहरराव देशमुख
प्रणिता देवरे प्रदेश पातळीवर भाजपात सक्रिय ?
मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा; ‘सारथी’ला ३५ कोटींहून अधिक निधी मंजूर
NCP's Vaishali Nagawade assaulted, case registered against three  persons in Pune

मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटीसाठी हालचाली वेगवान केल्या असून, पक्षातील विविध रिक्त पदांवर नियुक्त्या करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा सुरू झाल्याचे समोर आले आहे. मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी उशिरापर्यंत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक फेरबदल, प्रलंबित नियुक्त्या आणि पुढील राजकीय रणनीती यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. पक्षाची विविध आघाड्यांवरील कामगिरी अधिक प्रभावी करण्यासाठी नेतृत्वात काही बदल करण्याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

पक्षसंघटना अधिक गतिमान करण्यासाठी महिला, युवक आणि विद्यार्थी आघाड्यांमध्ये नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा विचार सुरू आहे. त्यानुसार, महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी वैशाली नागवडे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वासाठी आकाश झांबरे, तर युवक आघाडीसाठी निखिल ठाकरे यांच्या नावांचाही विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

तथापि, या नियुक्त्यांबाबत पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून, अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्वाच्या मंजुरीनंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुका लक्षात घेता तरुण तसेच महिला मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी पक्षसंघटनेत बदल करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. नव्या नेतृत्वामुळे संघटनात्मक कामकाजाला गती देण्याबरोबरच तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

COMMENTS