गोंदिया : गोंदिया शहरातील कुडवा परिसरात एका ४४ वर्षीय व्यक्तीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पत्नीने तिच्या निकटवर्तीयाच्या मदतीने
गोंदिया : गोंदिया शहरातील कुडवा परिसरात एका ४४ वर्षीय व्यक्तीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पत्नीने तिच्या निकटवर्तीयाच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे.
राजेंद्र कटरे (वय ४४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. २७ मे रोजी कुडवा येथील छोटा हनुमान मंदिराजवळ त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. परिसरातील नागरिकांनी याची माहिती त्यांच्या बहिणीला दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर राजेंद्र यांच्या गळ्यावर ओरखडे तसेच गळा दाबल्याच्या खुणा दिसून आल्याने मृत्यूबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान मृताची पत्नी अनिता कटरे हिचे संजय लिल्हारे याच्याशी गेल्या दीड वर्षांपासून निकटचे संबंध असल्याचे समोर आले. या संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.
तपासात पुढे असे निष्पन्न झाले की, राजेंद्र कटरे हे या संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून अनिता कटरे आणि संजय लिल्हारे यांनी संगनमताने त्यांची हत्या करण्याचा कट रचला. त्यानुसार दोघांनी मिळून राजेंद्र यांचा गळा दाबून खून केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. प्राथमिक तपासात मृताच्या गळ्यावरील ओरखडे आणि इतर खुणा महत्त्वाचे पुरावे ठरले. त्यावरून पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी रामनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील खुनासंदर्भातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कुडवा परिसरात मोठी खळबळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या हत्येची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

COMMENTS