पुणे: महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून पुढील तीन दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्

पुणे: महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून पुढील तीन दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे हवामान विभागातील तज्ज्ञ सखाराम सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान चाळीस अंशांच्या पुढे पोहोचले आहे. अकोला आणि नंदुरबार येथे तापमानाने पंचेचाळीस अंशांचा टप्पाही ओलांडला आहे. या वाढत्या तापमानामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींना उष्णतेचा मोठा फटका बसू शकतो. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता नसल्यामुळे उष्णतेची तीव्रता कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलका आहार घ्यावा आणि उन्हापासून संरक्षणासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा सूर्य आग ओकत असल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे. हवामान विभागाने बहुतांश जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा जारी केला असून प्रशासनालाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

COMMENTS