नवी दिल्ली : देशभरात सध्या दोन टोकाच्या हवामान परिस्थितीचा अनुभव नागरिकांना येत आहे. एका बाजूला उत्तर प्रदेशात भीषण वादळ आणि पावसामुळे मोठी जीवित

नवी दिल्ली : देशभरात सध्या दोन टोकाच्या हवामान परिस्थितीचा अनुभव नागरिकांना येत आहे. एका बाजूला उत्तर प्रदेशात भीषण वादळ आणि पावसामुळे मोठी जीवितहानी झाली असून, दुसर्या बाजूला राजस्थान आणि मध्य प्रदेशात प्रचंड उष्णतेची लाट नागरिकांना हैराण करत आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज, अयोध्यासह सुमारे 30 जिल्ह्यांमध्ये बुधवारी आलेल्या वादळामुळे 94 जणांचा मृत्यू झाला. प्रयागराजमध्ये सर्वाधिक 17, तर भदोही जिल्ह्यात 16 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. बरेली येथे ताशी सुमारे 80 किलोमीटर वेगाने वाहणार्या वादळी वार्यामुळे एका तरुणासह पत्र्याचे शेड हवेत उडाल्याची घटना घडली. राज्यातील बांदा येथे तापमान 45.4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, आज 51 जिल्ह्यांसाठी मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानमध्ये उष्णतेचा प्रकोप कायम असून, जैसलमेर सलग चौथ्या दिवशी देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. येथे तापमान 46.1 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. बिकानेर, जोधपूर, जैसलमेर आणि बारमेर या भागांसाठी तीव्र उष्णतेचा लाल इशारा जारी करण्यात आला आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातही उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून, 25 हून अधिक जिल्हे त्याच्या प्रभावाखाली आहेत. ही परिस्थिती 18 मेपर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. खजुराहो येथे बुधवारी तापमान 45.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. इंदूर, उज्जैन, धार आणि रतलाम या भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा नारिंगी इशारा देण्यात आला आहे. काही भागांत रात्रीचे तापमानही वाढण्याची शक्यता आहे. हरियाणात गेल्या 24 तासांत तापमानात वाढ झाली असून, पाच शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेले. नारनौल येथे 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात 17 मेपासून उष्णतेच्या लाटेचा पिवळा इशारा लागू करण्यात आला आहे. बिहारमधील पूर्णिया, कटिहारसह सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा नारिंगी इशारा देण्यात आला आहे. तसेच उत्तराखंडच्या डोंगराळ भागांत पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गारपीट आणि जोरदार वार्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज
पुढील दोन दिवसांचा अंदाज पाहता राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह वादळी पाऊस पडू शकतो. बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, आसाम, मेघालय, केरळ आणि कर्नाटक या राज्यांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशातही पुढील दोन दिवसांत वादळी पाऊस आणि जोरदार वार्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

COMMENTS