बीड: केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील श्याम विद्यालय, श्याम कनिष्ठ महाविद्यालय व श्याम गदळे कला-विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेचे औच

बीड: केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील श्याम विद्यालय, श्याम कनिष्ठ महाविद्यालय व श्याम गदळे कला-विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे प्रेरणास्थान श्री गुरु शामरावजी गदळे व मातोश्री बाळूताई शामराव गदळे यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. जयश्री शरद गदळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी आदरांजली वाहून गुरुवर्यांच्या विचारांचे स्मरण केले.
प्रतिमा पूजनानंतर आयोजित सत्कार व मनोगत सोहळ्यात प्राचार्या सौ. जयश्री गदळे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देऊन त्यांना एक आदर्श नागरिक बनवण्यात गुरूचे योगदान अमूल्य असते. श्री गुरु शामरावजी गदळे यांनी लावलेले हे शिक्षणाचे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले असून, त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम ही संस्था करत आहे.”
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी गुरुप्रति आपला आदर व कृतज्ञता व्यक्त करणारी मनोगते व्यक्त केली. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
या कार्यक्रमास शाळेचे व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तात्यासाहेब डोईफोडे यांनी केले, तर बी. एस. मुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS