Homeताज्या बातम्या

राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक व प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी; आईला प्रथम गुरू मानून माता पालकांचे पाद्यपूजन!

बीड: शहरातील राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक व प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्य

कर्जतमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या; नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याने घेतला गळफास
नसरापूर अत्याचार आणि हत्या खटल्यात ६५ वर्षीय आरोपी दोषी; अंतिम शिक्षेचा निर्णय २९ जूनला
महेश दीक्षित आयबीचे (IB) नवे संचालक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

बीड: शहरातील राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक व प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य पी. एन. पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. आय. पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार केला. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरूंच्या महतीवर आधारित विविध भाषणे व गीतांचे सादरीकरण केले.

शिक्षकांच्या वतीने श्रीमती वाघमारे ए. के. यांनी संत कबीरांच्या दोह्यांच्या माध्यमातून माणसाच्या जीवनातील गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व विशद केले. प्रमुख पाहुणे ए. आय. पाटील यांनी ‘प्रथम गुरू आई’ या विषयावर मार्गदर्शन करताना राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील संस्कारांचे दाखले दिले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य पी. एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात शिक्षण व गुरूंची भूमिका यावर प्रकाश टाकला.

यानंतर प्रत्येकाच्या जीवनातील प्रथम गुरू असलेल्या आईला नमन करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हस्ते माता पालकांचे पाद्यपूजन करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाने उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले आणि पालकांनी अत्यंत भावूक होऊन विद्यालयाच्या या संकल्पनेचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जाधव एस. आर. व दहावीची विद्यार्थिनी कु. दीक्षा शर्मा यांनी केले, तर आभार श्री. व्ही. आर. घोडके यांनी मानले. या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS