बीड : बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र नेकनूर येथे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रागट्य सोहळ्यासह संत वै. सुदामदेव महाराज यांच्या 24

बीड : बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र नेकनूर येथे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रागट्य सोहळ्यासह संत वै. सुदामदेव महाराज यांच्या 24 व्या पुण्यतिथी उत्सवाची गुरुवारी काल्याच्या कीर्तनाने मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सांगता झाली.
महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी टाळ-मृदंगाच्या गजरात, भजन-कीर्तनाच्या जयघोषात श्रीराम जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्यास ह.भ.प. हरिहर भारती महाराज, नवनाथ महाराज, विश्वनाथ अप्पा कपिलधार, सुरेश महाराज जाधव, श्रीकृष्ण महाराज यादव, अच्युत महाराज घोडके, रंजीत महाराज शिंदे, दिनेशानंद महाराज शास्त्री, वसंत महाराज शिंदे, गणेश महाराज अस्वले यांच्यासह बंकटस्वामी संस्थानचे आजी-माजी विद्यार्थी, विश्वस्त व हजारो भाविक उपस्थित होते. कीर्तनात महंत मेंगडे महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर चिंतन मांडत अध्यात्मिक संदेश दिला-
हरिनें माझे हरिले चित्त। भार वित्त विसरले॥
आतां कैसी जाऊं घरा। नव्हे बरा लौकीक॥
पारखियांसी सांगतां गोष्टी। घरची कुटी खातील॥
तुका म्हणे निवांत राहीं। पाहिले पाहीं परतोनी॥
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, प्रभू श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक असून त्यांच्या आदर्श तत्वांमधून आजच्या समाज व्यवस्थेला दिशा मिळते. राम व कृष्ण हे भगवानाचे पूर्ण अवतार असून रामाच्या चरित्राचे आचरण आणि कृष्णाच्या चरित्राचे स्मरण करावे. शुद्ध अंतःकरणाने नामस्मरण हीच खरी सोपी भक्ती आहे. वारकरी संप्रदाय अंधश्रद्धेला कधीही थारा देत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. संत सुदामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बोलताना त्यांनी त्यांच्या त्यागमय जीवनाचा उल्लेख करत, प्रेमळ अंतःकरणाचा दयाळू साधू म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी गरीब-गरजूंच्या दुःखनिवारणासाठी आयुष्य समर्पित केले, असे सांगितले. तसेच वै. रामहरी बाबा व वै. दिगंबर बाबा यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. कीर्तनातून शिक्षणाचे महत्त्व, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्महत्या आदी सामाजिक विषयांवर प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमात गायनाचार्य पांडुरंग महाराज शिंदे, आदित्य महाराज, यश महाराज, भगवान महाराज यांचे गायन तर मृदंग साथ राम महाराज गायकवाड व अशोक महाराज येडे यांनी दिली. कीर्तनानंतर दहीहंडी फोडून काल्याचा अभंग सादर करण्यात आला व हजारो भाविकांना बूंदी व लाही-चिवड्याचा महाप्रसाद देण्यात आला.
नारळी सप्ताहासाठी पालखी प्रस्थान
काल्याच्या कीर्तनानंतर संत बंकटस्वामी महाराज यांच्या फिरत्या नारळी सप्ताहासाठी पालखीसह हजारो वारकरी मांडवखेलकडे रवाना झाले. मांडवखेल येथे 28 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान आठ दिवसीय नारळी सप्ताह होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS