मन जिंकण्याचा मार्ग म्हणजेच खरी भक्ती : कीर्तनकार आसावरी जोशी (रवंदे)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मन जिंकण्याचा मार्ग म्हणजेच खरी भक्ती : कीर्तनकार आसावरी जोशी (रवंदे)

नांदेड : भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी योगमार्ग, कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्तीमार्ग असे चार मार्ग सांगितले गेले असले, तरी सर्वसामान्यांसाठी सर्वात

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सनी देओलने तोडले मौन
आर्थिक बचतीचा मंत्र विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी महत्वाचा ः अभय आव्हाड
राज्यात पुन्हा थंडीची झुळूक
The current image has no alternative text. The file name is: 13-1.jpg

नांदेड : भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी योगमार्ग, कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्तीमार्ग असे चार मार्ग सांगितले गेले असले, तरी सर्वसामान्यांसाठी सर्वात सोपा, सहज आणि प्रभावी मार्ग म्हणजे भक्तीमार्ग होय, असे प्रतिपादन कीर्तनकार सौ. आसावरी साईप्रसाद जोशी (रवंदे) यांनी केले. राधिकानगर येथील साई गणेश मंदिरात श्रीराम जन्म महोत्सवानिमित्त आयोजित कीर्तनात त्यांनी भावपूर्ण आणि चिंतनशील निरूपण केले. या कीर्तनात त्यांनी संत रोहिदास यांचे जीवनचरित्र अतिशय अभ्यासपूर्ण व प्रभावी वक्तृत्व शैलीतून श्रोत्यांसमोर मांडले.
आजचा माणूस सोप्या मार्गावर विश्वास ठेवत नाही आणि कठीण मार्गही स्वीकारत नाही, ही जीवनातील मोठी विसंगती असल्याचे त्यांनी नमूद केले. मनुष्य आडराणात अडकला आहे, असे सांगत संतांनी दिलेल्या भक्तीमार्ग स्वीकारा या संदेशाची आठवण करून दिली. मात्र, चंचल मन हेच साधनेतील सर्वात मोठे अडथळे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संत दासगणू महाराजांच्या घाल मनाच्या गळ्यात माळा या अभंगावर आधारित निरूपण करत, बाह्य आडंबरापेक्षा अंतर्मनाची शुद्धी अधिक महत्त्वाची असल्याचा संदेश त्यांनी दिला. भगवद्गीतेतील अर्जुनाच्या प्रश्नाचा दाखला देत मनावर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित केली. तसेच पतंजली योगसूत्रांचा संदर्भ देत, सातत्याने केलेली साधना ही सवय बनते, असेही त्यांनी सांगितले. संत कबीरदास आणि संत नामदेव महाराजांच्या अभंगांचा आधार घेत, मनाची चंचल प्रवृत्ती आणि नामस्मरणातील अडथळे स्पष्ट केले. मनाच्या मागे न लागता त्याला योग्य मार्गावर आणणे, हीच खरी साधना, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. भगवंताशी एकरूप होण्याचे सुंदर उदाहरण देताना त्यांनी तू चंदन, मी पाणी, तू फूल, मी धागा, आणि तू मुरली, मी तान या रूपकांद्वारे समर्पणाची अनुभूती व्यक्त केली. या उदाहरणांतून भक्ती म्हणजे स्वतःला विसरून भगवंतात विलीन होणे, हे तत्त्व त्यांनी प्रभावीपणे मांडले. या कीर्तनातून उपस्थित भाविकांना अंतर्मुख करणारा, मनशुद्धी आणि समर्पणाचा गहन संदेश मिळाला. या कीर्तनासाठी संवादिनीवर मंगेश जवळेकर व तबल्याची साथसंगत प्रशांत गाजरे यांनी दिली. राजेश ,योगेश महाराज व अमर नेरलकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

COMMENTS