अहिल्यानगर : शहरातील मुकुंदनगर परिसरात शुक्रवारी १०-१५ जणांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज

अहिल्यानगर : शहरातील मुकुंदनगर परिसरात शुक्रवारी १०-१५ जणांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज करमसिंग परदेशी यांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त समोर येताच हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत कापड बाजारपेठेतील दुकाने बंद पाडली. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुकुंदनगर परिसरात काही दिवसांपूर्वी पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना १० ते १५ जणांच्या टोळक्याने लोखंडी दांडक्यांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. यात धीरज परदेशी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शनिवारी रात्री फरार मुख्य चार आरोपी युनूस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद यांना अटक केली आहे. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला हे अद्याप अस्पष्ट असले, तरी धीरज हे हिंदुत्ववादी असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. घटनेनंतर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून हिंदुत्ववादी संघटनांकडून अहिल्यानगर बंदचा इशारा देण्यात आला आहे.
धीरज परदेशी यांच्या निधनाची बातमी समजताच रुग्णालयाबाहेर नातेवाईक, नागरिक आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मयत धीरज परदेशी यांच्या पत्नीचा आक्रोश धीरज परदेशी यांच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर त्यांच्या पत्नीने रुग्णालयाबाहेर आक्रोश करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच पतीला ज्या ठिकाणी मारहाण झाली, त्याच ठिकाणी अंत्यविधी करण्याची मागणी त्यांनी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन धीरज परदेशी हत्याप्रकरणातील आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी आणि आरोपींची घरे पाडण्यात यावीत, या मागण्यांसाठी रविवारी सायंकाळी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS