नांदेड : ओबीसी आणि बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून ठोस पावले उचलत असून, तरुणांनी नोकरी मागणारे न बनता

नांदेड : ओबीसी आणि बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून ठोस पावले उचलत असून, तरुणांनी नोकरी मागणारे न बनता रोजगार निर्माण करणारे व्हावे, असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांनी केले. नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आ. राजेश पवार, आ.बाबुराव कोहळीकर, महापौर कविता मुळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री सावे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, ओबीसी समाजातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन कर्जसुविधा, कौशल्यविकास आणि स्वयंरोजगाराला चालना देणार्या योजना प्रभावीपणे राबवत आहे. महामंडळांच्या माध्यमातून सुलभ कर्जपुरवठा करून नवउद्योजक घडविण्याचा शासनाचा प्रयत्न असून, या मेळाव्याचा लाभ घेऊन तरुणांनी स्वतःचे उद्योग उभे करावेत, असे आवाहन त्यांनी केले. शैक्षणिक क्षेत्रातही शासनाकडून महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले जात असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, दरवर्षी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच राज्यभरात विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे उभारण्यात आली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधार योजनांद्वारे निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. यावेळी मार्गदर्शन करताना अशोकराव चव्हाण यांनी ‘विकसित भारत 2047’ या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी कौशल्याधारित रोजगार आणि उद्योजकतेला चालना देणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. सध्या 14 महामंडळांमार्फत कर्जवाटप सुरू असून, आतापर्यंत हजारो लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्जाची परतफेड होत असल्याने योजना यशस्वी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. अजित गोपछडे यांनीही या मेळाव्यामुळे स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जवाटप करण्यात आले तसेच काहींना वाहनांच्या चाव्या देऊन प्रोत्साहन देण्यात आले. विविध योजनांच्या माहिती पुस्तिकांचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. नांदेडसह लातूर, परभणी, हिंगोली आदी जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने तरुण-तरुणी आणि लाभार्थी या मेळाव्यास उपस्थित होते. या उपक्रमामुळे मराठवाड्यातील स्वयंरोजगाराला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

COMMENTS