पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के ल

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हा सर्वात कमी निकाल ठरला असून निकालाचा टक्का घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. मुलींचा निकाल 93.15 टक्के असून मुलांचा निकाल 86.80 टक्के आहे. त्यामुळे मुलींचा निकाल मुलांपेक्षा 6.35 टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत
यंदाही कोकण विभागाने 94.14 टक्के निकालासह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसरीकडे, शैक्षणिक पद्धतीसाठी ओळख असलेल्या लातूर विभागाचा निकाल 84.14 टक्के लागल्याने तो राज्यात शेवटच्या क्रमांकावर राहिला आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम आणि औद्योगिक प्रशिक्षण शाखांसाठी एकूण 14 लाख 44 हजार 713 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 33 हजार 058 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 12 लाख 86 हजार 843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. खाजगी विद्यार्थ्यांची संख्या 37 हजार 559 होती. त्यापैकी 36 हजार 941 जणांनी परीक्षा दिली आणि 29 हजार 634 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांचा निकाल 80.21 टक्के लागला. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या 50 हजार 876 होती. त्यापैकी 50 हजार 346 जणांनी परीक्षा दिली आणि 18 हजार 349 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या गटाचा निकाल 36.44 टक्के नोंदवला गेला. दिव्यांग विद्यार्थ्यांनीही चांगली कामगिरी केली आहे. एकूण 8 हजार 446 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 हजार 367 जणांनी परीक्षा दिली आणि 7 हजार 579 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांचा निकाल 90.58 टक्के आहे. पात्र विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्याची कार्यवाहीही करण्यात आली. एकूण 153 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूणच, राज्याचा निकाल घसरला असला तरी काही विभागांनी सातत्य राखत चांगली कामगिरी केली आहे, तर काही विभागांसाठी हा निकाल चिंतेचा विषय ठरत आहे.
निकाल घसरण्यामागे कॉपीमुक्त अभियान : कुलकर्णी
राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी 12 वीच्या निकालाची माहिती देतांना सांगितले की, यंदाराज्याचा निकाल 89.79 टक्के निकाल लागला आहे, तर कोकण विभाग 94.14 टक्क्यांसह अव्वल आहेत. यावर्षी देखील निकाल घटला आहे, यावरती बोलताना कुलकर्णी म्हणाले, निकाल घटण्यामागे कारण मुख्यत्वेकरून मी मागचा निकाल कंपेर करतो त्यामागे कॉपीमुक्त अभियान चांगल्या प्रकारे राबवलं गेलं असं मला वाटतं. गेल्या वर्षी एकाही कर्मचार्यावरती कारवाई झाली नव्हती, यावेळी 100 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्यावर्षी 91.88 निकाल होता यावर्षी 2.0 टक्क्याने निकाल कमी झाला आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण : 94.14 टक्के
पुणे : 91.25 टक्के
अमरावती : 90.92 टक्के
नाशिक : 90.72 टक्के
मुंबई : 90.08 टक्के
कोल्हापूर : 89.97 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 88.68 टक्के
नागपूर : 88.67 टक्के
लातूर : 84.14 टक्के

COMMENTS