नवी दिल्ली : देशभरात शनिवारी सकाळी सुमारे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कोट्यवधी मोबाईल फोनवर एकाच वेळी इशारा संदेश पोहोचल्याने काही काळ नागरिका

नवी दिल्ली : देशभरात शनिवारी सकाळी सुमारे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कोट्यवधी मोबाईल फोनवर एकाच वेळी इशारा संदेश पोहोचल्याने काही काळ नागरिकांमध्ये गोंधळ आणि अस्वस्थता निर्माण झाली. अनेकांच्या फोनवर अचानक सायरनसारखा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर स्क्रीनवर संदेश दिसू लागला. काही फोनमध्ये हा संदेश वाचूनही दाखवण्यात आला.
या अनपेक्षित इशार्यामुळे अनेकजण घाबरले, तर काहींना नेमके काय घडत आहे याची शंका वाटू लागली. मात्र, संबंधित यंत्रणांनी लगेचच स्पष्ट केले की हा प्रत्यक्ष आपत्तीचा इशारा नसून केवळ चाचणीचा भाग आहे. ही चाचणी राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आली होती. देशात आपत्तीच्या वेळी नागरिकांपर्यंत तात्काळ माहिती पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या इशारा प्रणालीची तपासणी करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला. या माध्यमातून एका विशिष्ट भागातील सर्व मोबाईलवर एकाच वेळी संदेश पोहोचवण्याची क्षमता तपासण्यात आली. या प्रणालीत वापरलेल्या विशेष तंत्रामुळे निवडलेल्या परिसरातील सर्व सक्रिय मोबाईल साधनांवर एकाच क्षणी सूचना पाठवता येते. त्यामुळे भूकंप, पूर, चक्रीवादळ किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेत सतर्क करता येणार आहे. शनिवारी करण्यात आलेल्या या चाचणीत देशातील विविध राज्यांच्या राजधानींसह प्रमुख शहरांचा समावेश होता. संदेश विविध भाषांमध्ये पाठवण्यात आला, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना तो सहज समजेल. संदेशामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की ही केवळ चाचणी असून नागरिकांनी कोणतीही कृती करण्याची गरज नाही. दरम्यान, सरकारने दोन दिवसांपूर्वीच नागरिकांना अशा प्रकारचा संदेश येऊ शकतो, याची पूर्वसूचना दिली होती. त्यामुळे घाबरू नये, असे आवाहनही करण्यात आले होते.

COMMENTS