बीड मतदारसंघातील मौजे हाजीपूर (ता. शिरूर का.) येथील एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शेतात काम करत असताना वीज धक्क्याने (करंट ल

बीड मतदारसंघातील मौजे हाजीपूर (ता. शिरूर का.) येथील एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शेतात काम करत असताना वीज धक्क्याने (करंट लागून) तरुण शेतकरी कृष्णा उगले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार महावितरण विभाग आणि संबंधित कंत्राटदाराच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे घडला असून, दोषींवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केली आहे.
हाजीपूर (ता.शिरूर का.) येथे महावितरण विभागाचे काम सुरू होते. काम सुरू असताना तिथे सुरक्षेची कोणतीही आवश्यक ती काळजी आणि खबरदारी महावितरणचे संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्याकडून घेतली गेली नाही. विशेष धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित शेतकर्याने 6 जून 2026 रोजीच महावितरण विभागाकडे शेतातील निकामी पोल आणि धोकादायक तारा काढून घेण्याबाबत रीतसर अर्ज केला होता. मात्र, महावितरणच्या प्रशासनाने या अर्जावर वेळेत कोणतीही कारवाई केली नाही. प्रशासनाच्या याच दिरंगाईमुळे आज एका निष्पाप तरुण शेतकर्याला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी. मृत कृष्णा उगले यांच्या कुटुंबाला शासनाकडून आणि महावितरणकडून तात्काळ मोठी आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप शेतकर्याचा बळी गेल्याने बीड जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, आता यावर शासनाकडून तातडीने निर्णय घेण्याची मागणी आ.क्षीरसागर यांनी केली आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर; एका वर्षात दुसरा मुलगा गमावला
मृत कृष्णा उगले यांना दोन भाऊ होते. त्यापैकी एका भावाचा गेल्या वर्षी पुणे येथे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता कृष्णा यांच्याही जाण्याने वृद्ध आई-वडिलांचा मोठा आधार हिरावला गेला आहे. त्यांचा तिसरा भाऊ सुशिक्षित बेरोजगार असून, या वृद्ध माता-पित्याला आधार देण्यासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याला शासकीय सेवेत सामावून घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे. याबाबत आ.क्षीरसागर यांनी मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे, उपमुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून मागणी
आ.संदीप क्षीरसागर यांचा हाजीपूर येथील प्रकरणात पाठपुरावा सुरू आहे. आ.क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 6 जुलै 2026 रोजी पत्राद्वारे माहिती देऊन योग्य कार्यवाहीची मागणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची बुधवारी (दि.8) रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन सदरील प्रकरणाची माहिती देऊन दोषींवर कठोर कारवाई आणि पीडित कुटुंबाला जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

COMMENTS