जालना : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जालना एक्झिटच्या पुढे टँकरमधून गॅस गळती झाल्याने मंगळवारी दुपारपासून वा

जालना : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जालना एक्झिटच्या पुढे टँकरमधून गॅस गळती झाल्याने मंगळवारी दुपारपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेमुळे तब्बल 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून हजारो प्रवासी महामार्गावर अडकून पडले आहेत. गैरसोयीमुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गतिमान आणि सुरक्षित प्रवासाचे स्वप्न दाखवत उभारण्यात आलेला हा महामार्ग वारंवार अडचणींचा ठरत असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. नागपूर ते मुंबई दरम्यानचा हा मार्ग सुरू झाल्यापासून अपघात आणि वाहतूक कोंडीच्या घटना वाढत आहेत. नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात सात मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत प्रशासन गांभीर्याने पावले उचलत नसल्याची टीका होत आहे. मंगळवारी जालना एक्झिटपासून काही अंतरावर एका टँकरमधून गॅस गळती होत असल्याचे निदर्शनास आले. संभाव्य धोका लक्षात घेऊन वाहतूक तातडीने थांबवण्यात आली; मात्र पर्यायी व्यवस्था करण्यात विलंब झाल्याने कोंडी वाढत गेली. काही तासांतच वाहनांच्या रांगा 25 किलोमीटरपर्यंत पोहोचल्या. दरम्यान, जालना एक्झिटजवळ अडकलेल्या लहान वाहनचालकांनी बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्याची मागणी केली; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. महामार्ग पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने संताप अधिकच वाढला. या संदर्भात नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणार्या प्रवाशांना महामार्ग सुरळीत असल्याचे सांगण्यात आल्याने परिस्थितीबाबत समन्वयाचा अभाव स्पष्ट झाला. प्रत्यक्षात मात्र अनेक किलोमीटरपर्यंत वाहने ठप्प असल्याचे दृश्य दिसत होते. उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि इतर यंत्रणादेखील या परिस्थितीपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन व्यवस्थापन, समन्वय आणि प्रतिसाद यंत्रणा पुन्हा एकदा प्रश्नचिन्हात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

COMMENTS