गोवा राज्याच्या ताळगाव मतदार संघाच्या भाजप आमदार तथा माजी महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे रविवार, दि. 19 कर्करोगाच्या आजाराने खासगी रुग्णालय
गोवा राज्याच्या ताळगाव मतदार संघाच्या भाजप आमदार तथा माजी महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे रविवार, दि. 19 कर्करोगाच्या आजाराने खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्या 56 वर्षांच्या होत्या. सक्रिय आणि प्रभावी महिला आमदार म्हणून त्यांचा लौकिक होता.
जेनिफर मोन्सेरात यांनी आपली राजकीय कारकीर्द ताळगाव पंचायत सरपंच व त्यानंतर जिल्हा पंचायत सदस्यापासून केली. त्या सन 2012 पासून 2017 व 2022 अशा सलग तीन वेळा ताळगाव मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या महसूल मंत्री तथा पणजीचे आमदार अतानासिओ (बाबूश) मोन्सेरात यांच्या पत्नी, तर पणजी महानगरपालिकेचे (सीसीपी) महापौर रोहित मोन्सेरात यांच्या त्या मातोश्री होत.
24 मार्च 1970 रोजी जन्मलेल्या जेनिफर मोन्सेरात यांनी सन 2005 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला. जुलै 2019 मध्ये काँग्रेसच्या दहा आमदारांसह त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सन 2008 मध्ये पोलीस स्थानक दगडफेक प्रकरणी अनेकांविरुध्द गुन्हा नोंद झाला होता. त्यामध्ये त्यांचाही समावेश होता व सध्या हा खटला न्यायालयात सुरू आहे.
भाजपमध्ये प्रवेशानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांच्याकडे महसूल, माहिती-तंत्रज्ञान, कामगार व रोजगार ही महत्त्वाची खाती सोपविण्यात आली होती. त्या काळातील सावंत मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री होत्या. तसेच ताळगाव मतदार संघातून निवडून येणार्या त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या. सन 2012 पासून गोवा विधानसभेत एकाच वेळी सदस्य म्हणून कार्य करणारे पहिले पती-पत्नी दाम्पत्य म्हणून जेनिफर आणि बाबूश मोन्सेरात यांची नोंद झाली होती.
गेल्या दशकभरात त्यांनी ताळगाव मतदार संघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले. त्यांच्या निधनामुळे गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

COMMENTS