विद्यार्थी हा देशाचा भविष्यकाळ आहे, तरुणाई ही राष्ट्राची ऊर्जा आहे, नव्या पिढीच्या सामर्थ्यावर देशाचा विकास अवलंबून आहे, असे उपदेश अचानक वाढू लाग

विद्यार्थी हा देशाचा भविष्यकाळ आहे, तरुणाई ही राष्ट्राची ऊर्जा आहे, नव्या पिढीच्या सामर्थ्यावर देशाचा विकास अवलंबून आहे, असे उपदेश अचानक वाढू लागले की त्यामागे केवळ तरुणांवरील प्रेम आहे की राजकारणाची गरज, हा प्रश्न विचारावाच लागतो. कारण आंदोलन रस्त्यावर उतरल्याशिवाय, प्रश्न पेटल्याशिवाय आणि सत्तेविरोधातील असंतोषाची तीव्रता जाणवल्याशिवाय सत्ताधार्यांना विद्यार्थी आठवत नाहीत, असा अनुभव वारंवार येतो. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, व्यवस्थेला जाब विचारला आणि आंदोलनाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवली की अचानक विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता व्यक्त होऊ लागते. त्यांच्यावर विश्वास असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या स्वप्नांचे कौतुक केले जाते. त्यांना देशाच्या विकासाचे शिल्पकार ठरवले जाते. हे चित्र जितके गोड आहे, तितकेच त्यामागचे राजकारण समजून घेणे आवश्यक आहे.
नीटच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष याचे ताजे उदाहरण आहे. प्रश्न केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नाही. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी, त्यांच्या कष्टांशी आणि पालकांच्या आर्थिक-सामाजिक त्यागाशी तो जोडलेला आहे. वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न घेऊन वर्षानुवर्षे अभ्यास करणार्या विद्यार्थ्याला परीक्षेतील गैरप्रकाराची शंका आली, तर त्याचा परिणाम केवळ एका निकालावर होत नाही; त्याच्या संपूर्ण आयुष्याच्या नियोजनावर होतो. अशा परिस्थितीत विद्यार्थी रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याला केवळ आंदोलनकर्ता म्हणून पाहणे ही मोठी चूक ठरते. तो व्यवस्थेला आरसा दाखवत असतो. जंतरमंतरवरील आंदोलनानंतर निर्माण झालेला रोष ही बाब सत्ताधार्यांनी गांभीर्याने घेतली, असे चित्र आता दिसत आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामांकित भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान समारंभात तरुणांच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त केला. आमचा तुमच्यावर विश्वास आहे. देशाला तुमची गरज आहे, हा संदेश वरकरणी अत्यंत सकारात्मक आहे. प्रत्येक पिढीची राष्ट्रीय जबाबदारी असते, पुढील काही दशकांत तरुणांच्या निर्णयांचा विकसित भारताच्या प्रवासावर परिणाम होणार आहे, असे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या बदलत्या जगात सतत शिकणारी पिढीच पुढे जाईल, असेही त्यांनी अधोरेखित केले. यात चुकीचे काहीच नाही. उलट तरुणांना प्रोत्साहन देणे ही सत्तेची जबाबदारीच आहे. मात्र प्रश्न असा आहे की, विद्यार्थ्यांवरचा हा विश्वास त्यांच्या आंदोलनानंतरच इतका ठळकपणे का व्यक्त होतो?
विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की त्यांना देशद्रोही, दिशाभूल झालेले किंवा राजकीय हेतूने प्रेरित असे ठरवण्याचा मोह सत्तेला होतो; पण तेच विद्यार्थी सत्तेच्या व्यासपीठावर टाळ्या वाजवण्यासाठी बसले की त्यांना राष्ट्रनिर्माते म्हटले जाते, अशी विसंगती लोकशाहीसाठी धोकादायक आहे. विद्यार्थी सरकारच्या बाजूने बोलतो म्हणून तो देशभक्त आणि सरकारला प्रश्न विचारतो म्हणून तो विरोधक, असा सोपा हिशेब लोकशाहीत चालत नाही. आज विद्यार्थ्यांचे महत्त्व सत्तेला नव्याने जाणवत आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. तरुण मतदारसंख्या मोठी आहे. सामाजिक माध्यमांपासून रस्त्यावरील आंदोलनापर्यंत तरुणांचा प्रभाव प्रचंड आहे. एका विद्यार्थ्याचा प्रश्न काही मिनिटांत लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे विद्यार्थी आता केवळ परीक्षा देणारा घटक राहिलेला नाही. तो मतदार आहे, मतप्रवाह घडवणारा नागरिक आहे आणि सत्तेला प्रश्न विचारण्याची ताकद असलेला सामाजिक घटक आहे. हे केवळ पंतप्रधानांपुरते मर्यादित नाही. सत्तेच्या राजकारणात विद्यार्थी आणि तरुणाईला आपल्याकडे ओढण्याची स्पर्धाच सुरू झाल्याचे दिसते. सरसंघचालक मोहन भागवत असोत, अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत; तरुण पिढीशी संवाद साधण्याची, त्यांच्या अपेक्षा समजून घेण्याची आणि त्यांना आपल्याशी जोडण्याची भाषा अधिक तीव्र होत आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते-तरुणाईची ताकद आता कोणत्याही राजकीय व्यवस्थेला दुर्लक्षित करता येणार नाही. पण तरुणांना कुरवाळणे आणि तरुणांचे प्रश्न सोडवणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. विद्यार्थ्यांना रॉकेट दाखवून प्रेरणा देता येईल; पण त्यांच्या परीक्षेतील पारदर्शकतेचा प्रश्न त्यातून सुटत नाही. ड्रोनची उदाहरणे देऊन नव्या संधींची चर्चा करता येईल; पण बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, प्रश्नपत्रिका फुटणे, निकालातील विलंब, शिक्षणाचा वाढता खर्च आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची असमान संधी यांची उत्तरे त्यातून मिळत नाहीत. अंतराळ क्षेत्र तरुणांसाठी खुले झाले, ही अभिमानाची बाब आहे; परंतु लाखो तरुणांना दर्जेदार शिक्षण आणि रोजगाराची समान संधी मिळते का, हा अधिक मूलभूत प्रश्न आहे. तरुणांच्या हातात रॉकेट देण्यापूर्वी त्यांच्या हातातील प्रश्नपत्रिका सुरक्षित आहे याची खात्री व्यवस्था करू शकते का, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.
आज सरकार तरुणांना सांगते-शिका, सतत नवे कौशल्य आत्मसात करा, तंत्रज्ञानाशी जुळवून घ्या, देशासाठी काम करा. हे सर्व आवश्यक आहे. पण त्याच वेळी व्यवस्थेनेही तरुणांकडून काही शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले तर सरकारने उत्तरे द्यायला हवीत. आंदोलन झाले तर आंदोलनाचे राजकारण करण्याऐवजी त्यामागील वेदना समजून घ्यायला हव्यात. परीक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला तर चौकशी पारदर्शक असली पाहिजे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक श्रम यांना शासनाने किंमत दिली पाहिजे.
सत्तेला विद्यार्थ्यांची ताकद कळली आहे, ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे. मात्र ही जाणीव केवळ निवडणुकीच्या गणितापुरती मर्यादित राहू नये. तरुणांना आपल्या बाजूला करण्यासाठी त्यांच्या भाषेत बोलणे आणि प्रत्यक्षात त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे, हा विरोधाभास फार काळ टिकणार नाही. आजची तरुण पिढी केवळ भाषण ऐकणारी नाही; ती भाषणाची तुलना वास्तवाशी करणारी पिढी आहे. मोठमोठ्या संस्थांमधील पदवीदान समारंभात तरुणांच्या क्षमतेचे कौतुक करणे आवश्यकच आहे. पण देशाच्या कानाकोपर्यातील सामान्य विद्यार्थ्यालाही त्याच विश्वासाचा अनुभव मिळायला हवा. महानगरातील तंत्रज्ञान संस्थेतील विद्यार्थ्याला मिळणारी संधी आणि छोट्या शहरातील, ग्रामीण भागातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्याला मिळणारी संधी यातील दरी कमी करणे ही खरी राष्ट्रीय जबाबदारी आहे. कारण तरुणाईला केवळ टाळ्या नकोत; तिला संधी हवी आहे. तिला घोषवाक्ये नकोत; तिला पारदर्शक व्यवस्था हवी आहे. तिला कौतुकाचे शब्द नकोत; तिला गुणवत्तेला न्याय देणारी परीक्षा व्यवस्था हवी आहे. तिला स्वप्ने दाखवण्यापेक्षा ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सुरक्षित आणि समान मैदान हवे आहे. आज आंदोलनानंतर सत्तेला विद्यार्थ्यांची ताकद कळली असेल, तर त्या ताकदीचा आदर करण्याची हीच वेळ आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यावर त्यांना जवळ करण्याऐवजी ते प्रश्न विचारण्याआधीच त्यांचे प्रश्न ऐकण्याची संस्कृती निर्माण झाली पाहिजे. आंदोलन थांबवण्यासाठी प्रेमाचा हात पुढे करण्यापेक्षा आंदोलनाची वेळच येऊ नये, अशी शासनव्यवस्था उभी राहिली पाहिजे. विद्यार्थ्यांवर प्रेमाचे भरते आले असेल तर ते स्वागतार्ह आहे. पण हे प्रेम टिकवायचे असेल तर त्याची परीक्षा भाषणांच्या व्यासपीठावर होणार नाही; ती परीक्षा प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षिततेत, परीक्षेच्या पारदर्शकतेत, निकालाच्या विश्वासार्हतेत, रोजगाराच्या संधींत आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य भवितव्यात होईल.

COMMENTS