नांदेड - शहरातील काही नर्सिंग महाविद्यालयांकडून अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य अतिरिक्त शैक्षणिक शुल्क आकारले जात अस
नांदेड – शहरातील काही नर्सिंग महाविद्यालयांकडून अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य अतिरिक्त शैक्षणिक शुल्क आकारले जात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. शासनाच्या नियमानुसार संबंधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची रक्कम महाडीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात जमा होत असतानाही काही संस्थाचालकांकडून अतिरिक्त शुल्काची मागणी केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
यासंदर्भात काही विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. काही विद्यार्थ्यांकडून तब्बल 90 हजार रुपये, तर काहींकडून 50 हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. अतिरिक्त रक्कम न दिल्यास विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात असून, प्रॅक्टिकल परीक्षेत नापास करण्याची भीती दाखवली जाते, तर काही विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाच्या धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाकडून विविध शैक्षणिक सवलती आणि शुल्क प्रतिपूर्तीच्या योजना राबविल्या जात असताना, संस्थाचालकांकडूनच अतिरिक्त शुल्काच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर आर्थिक भार टाकला जात असेल, तर ही बाब गंभीर असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. शैक्षणिक संस्थांनी शासनाच्या शुल्कविषयक नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना अशा प्रकारे अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारींची जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करावी. विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेल्या शुल्काची तपासणी करून दोषी संस्थांवर नियमानुसार कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी तक्रारदार विद्यार्थ्यांनी केली आहे.

COMMENTS