अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात यंदाच्या मान्सूनने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने पेरण्या लांबल्या आहेत. शेतकरी चातका सारखी आभा

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात यंदाच्या मान्सूनने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने पेरण्या लांबल्या आहेत. शेतकरी चातका सारखी आभाळा कडे नजर लावून आहे. पावसामुळे खरीप हंगाम लांबला असल्यामुळे हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे पशुपालक व दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर जनावरे सांभाळण्याचे गंभीर संकट निर्माण झाले असून दूध उत्पादनावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.सदर स्थिती थोड्याबहुत फरकाने राज्यात सर्वत्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागामध्ये शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय हा अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार आहे. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने मका, ज्वारी, बाजरी तसेच इतर चारा पिकांची वाढ खुंटली आहे. विहिरी, बोअरवेल आणि शेततळीतील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत असल्याने चारा पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. परिणामी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत असून पशुपालकांना कोरड्या चाऱ्यावर किंवा बाजारातून महागड्या पशुखाद्यावर अवलंबून राहावे लागत आहे. सदर स्थिती थोड्याबहुत फरकाने राज्यात सर्वत्र दिसून येत आहे.
दूध संकलन केंद्रांवर येणाऱ्या दुधाच्या प्रमाणातही घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायाशी संबंधित संपूर्ण साखळीवर होणार आहे. नेवासा तालुक्यात अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. त्यामुळे चारा संकट अधिक तीव्र झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही फटका बसू शकतो.
दरम्यान, सर्वांचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले असून लवकर चांगला पाऊस झाल्यास हिरव्या चाऱ्याचे संकट काही प्रमाणात कमी होईल, अशी आशा पशुपालकांनी व्यक्त केली आहे.
आर्थिक गणित कोलमडले
हिरवा चारा हा दुभत्या जनावरांच्या आरोग्यासाठी आणि दूध उत्पादन वाढीसाठी अत्यंत आवश्यक मानला जातो. चाऱ्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊन दूध उत्पादनात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आधीच पशुखाद्य, औषधे व देखभालीचा खर्च वाढलेला असताना चाऱ्याच्या टंचाईमुळे पशुपालनाचे आर्थिक गणित अधिकच बिघडले आहे.
तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी
शेतकरी व पशुपालकांनी शासनाकडे तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, अनुदानित दरात पशुखाद्य उपलब्ध करून द्यावे तसेच चारा पिकांसाठी विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. कृषी व पशुसंवर्धन विभागाने परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS