चंदीगड : पंजाबमधील पटियाळा जिल्ह्यात सोमवारी रात्री रेल्वे मार्गावर झालेल्या स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. राजपुरा-शंभू दरम्यान अंबा

चंदीगड : पंजाबमधील पटियाळा जिल्ह्यात सोमवारी रात्री रेल्वे मार्गावर झालेल्या स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. राजपुरा-शंभू दरम्यान अंबाला-अमृतसर मालवाहतूक कॉरिडॉरवर सुमारे साडेआठच्या सुमारास कमी तीव्रतेचा स्फोट झाला. या घटनेमागे दहशतवादी कट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, विविध तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे.
घटनेच्या वेळी त्या मार्गावरून मालगाडी जात होती. स्फोट झाला तरी गाडीचे मोठे नुकसान टळले, मात्र चालकाला मोठा धक्का बसला. त्याने तत्काळ अधिकार्यांना संशयास्पद प्रकाराची माहिती दिल्याने पुढील कारवाई वेगाने सुरू झाली. स्फोटात रेल्वे रुळ आणि स्लीपरचे काही प्रमाणात नुकसान झाले असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात घटनास्थळी एक मृतदेह आढळून आला. हा स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न करणार्या व्यक्तीचाच असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. मृताची ओळख जगरूप सिंग (रा. पंजवार, जिल्हा तरनतारन) अशी पटली आहे. पोलिसांनी मृताच्या खिशातून रेल्वे तिकीट, मोबाईल फोन आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. त्याच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्सची सखोल तपासणी सुरू आहे. याशिवाय, अमृतसरमध्ये त्याने एक दुचाकी पार्क केल्याचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले असून ती वाहन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. स्फोटाच्या वेळी संशयित व्यक्ती घटनास्थळाजवळच उपस्थित होती आणि स्फोटाच्या तडाख्यात त्याचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती तपासात समोर येत आहे. स्फोटानंतर काही वेळाने पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यानंतर तातडीने पथके घटनास्थळी दाखल झाली. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी खलिस्तान समर्थक संघटनांकडून पंजाब आणि हरियाणातील रेल्वे मार्गांना लक्ष्य करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. यापूर्वीही जानेवारी महिन्यात सरहिंद परिसरात अशाच प्रकारचा स्फोट झाला होता.

COMMENTS