महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत प्रत्येक फेरीसाठी आकारण्यात येणारे वाढ

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत प्रत्येक फेरीसाठी आकारण्यात येणारे वाढीव शुल्क अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 28 जुलैपासून सुरू झाली असून ही प्रक्रिया चार फेर्यांमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यंदा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत बदल करत पहिल्या फेरीनंतर बेटरमेंटद्वारे नवीन जागा मिळाल्यास प्रत्येक फेरीसाठी स्वतंत्र शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार पहिल्या फेरीत जागा स्वीकारण्यासाठी 1 हजार रुपये, दुसर्या फेरीत बेटरमेंट झाल्यास 2 हजार रुपये आणि तिसर्या फेरीत पुन्हा जागा बदलल्यास 3 हजार रुपये शुल्क भरावे लागणार होते. हे शुल्क परत मिळणार नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी होती. विद्यार्थ्यांवर होणारा आर्थिक भार लक्षात घेऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांनी 22 जुलै रोजी राज्याचे शिक्षण मंत्री तसेच सीईटी कक्षाकडे निवेदन देऊन ही शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे मिळणार्या प्रवेशासाठी अतिरिक्त आर्थिक भार टाकणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले होते. राज्यातील विद्यार्थी व पालक संघटनांकडून आलेल्या निवेदनांची दखल घेत तसेच शासनाच्या सूचनांनुसार सीईटी कक्षाने वाढीव शुल्क आकारणीचा निर्णय मागे घेतला आहे. आता पूर्वीप्रमाणेच प्रवेश स्वीकृती शुल्क 1 हजार रुपये राहणार आहे. सीईटी कक्षाच्या या निर्णयाचे विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनांनी स्वागत केले असून डॉ. संजय तांदळे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.

COMMENTS