रात्रीच्या गाढ अंधाराचा फायदा घेत बेकायदेशीर साग लाकडाची विल्हेवाट लावण्याचा तस्करांचा डाव नांदेड वनविभागाने उधळून लावला आहे. गुप्त माहितीच्या आध

रात्रीच्या गाढ अंधाराचा फायदा घेत बेकायदेशीर साग लाकडाची विल्हेवाट लावण्याचा तस्करांचा डाव नांदेड वनविभागाने उधळून लावला आहे. गुप्त माहितीच्या आधारे किनवट जवळील चिखली (बु.) शिवारात घातलेल्या धाडीत लपवून ठेवलेला मौल्यवान सागाचा साठा हस्तगत करण्यात वनविभागाला यश आले आहे.
26 जुलैच्या मध्यरात्री किनवट आणि बोधडी वनपरिक्षेत्राच्या पथकाने चिखली परिसराला वेढा घातला. अत्यंत गोपनीयतेने सुरू असलेल्या या गस्तीदरम्यान संशयास्पदरित्या दडवून ठेवलेले 0.358 घनमीटर आकाराचे 4 सागी गोल (अनगड) जप्त करण्यात आले. बाजारभावानुसार या सागाची किंमत 7,554 रुपये इतकी असून, वनविभागाने लाकूड ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला आहे. उपवनसंरक्षक (नांदेड) मनीषा पाटील, सहायक वनसंरक्षक किरण चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने (प्रा.), सी. जी. पोतूलवार (बोधडी) आणि एन. एन. केंद्रे (फि. फ. किनवट) यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली ही कारवाई फत्ते झाली. या मोहिमेत वनपाल बी. टी. जाधव, मनोज गुरसाळी, वनरक्षक रवी दांडेगावकर, मारोती केंद्रे, बालाजी झंपलवाड आणि अरुण चुक्कलवार यांनी प्राणाची बाजी लावून सहभाग नोंदवला. तसेच खरबी वन्यजीव विभागाचे कर्मचारी व वाहनचालक बाळकृष्ण आवले यांनी वेळेवर धावून येत मोलाची साथ दिली. बोधडी (बु) आणि किनवट वनविभागाच्या या ऐनवेळी संयुक्त केलेल्या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध लाकूड तस्करांचे धाबे पार दणाणले आहेत.

COMMENTS