पुणे : क्रिकेटच्या इतिहास, नियम, पंचगिरी आणि खेळाडूंच्या मानसिकतेवर अभ्यासपूर्ण लेखन करून ज्येष्ठ लेखक व क्रिकेट समीक्षक डॉ. दत्ता विघावे यांनी आ
पुणे : क्रिकेटच्या इतिहास, नियम, पंचगिरी आणि खेळाडूंच्या मानसिकतेवर अभ्यासपूर्ण लेखन करून ज्येष्ठ लेखक व क्रिकेट समीक्षक डॉ. दत्ता विघावे यांनी आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. त्यांच्या क्रिकेटविषयक दीर्घकालीन आणि वैशिष्ट्यपूर्ण साहित्यसेवेची दखल घेत ‘ग्रेट विनर वर्ल्ड रेकॉर्ड्स’ या संस्थेने त्यांच्या नावाची अधिकृत जागतिक विक्रम म्हणून नोंद केली आहे. विशेष म्हणजे, डॉ. विघावे यांचा हा सहावा विश्वविक्रम ठरला आहे.
क्रिकेटच्या शतकानुशतकांच्या प्रवासाचा सखोल अभ्यास करत डॉ. विघावे यांनी चार महत्त्वपूर्ण ग्रंथांची निर्मिती केली आहे. ‘क्रिकेटपटू श्रद्धाळू की अंधश्रद्धाळू’, ‘अंपायरिंग : कृतज्ञता न मिळणारे पण उदात्त कार्य’, ‘वादांच्या विश्वातील पंचगिरी’ आणि ‘क्रिकेटचे नियम व कलमे’ या पुस्तकांद्वारे त्यांनी क्रिकेटच्या विविध अंगांचा वेध घेतला आहे. या ग्रंथांना केवळ साहित्यकृती म्हणून नव्हे, तर क्रिकेटच्या इतिहासाचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज म्हणूनही मान्यता मिळत आहे. मराठी भाषेत क्रिकेट विषयावर तेरा हजारांहून अधिक लेख लिहिण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. दैनिके, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक, संकेतस्थळे आणि विविध लेखन मंचांवर प्रकाशित झालेले त्यांचे लेख क्रिकेटप्रेमी, खेळाडू, पंच आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. पुरुष आणि महिला क्रिकेटमधील घडामोडींवर त्यांनी केलेले रंजक आणि अभ्यासपूर्ण लेखन वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. ‘ग्रेट विनर वर्ल्ड रेकॉर्ड्स’ संस्थेने 30 जून 2026 रोजी डॉ. विघावे यांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करून त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. क्रिकेट साहित्याच्या क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला हा नवा मानदंड अनेक नवोदित लेखकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.डॉ. विघावे यांच्या कार्याची दखल देशाबरोबरच रशिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांसारख्या राष्ट्रांनीही घेतली आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, दादासाहेब फाळके परिवार सन्मानासह विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मानद विद्वत पदवीने सन्मानित असलेल्या डॉ. विघावे यांचे साहित्य, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांतील योगदानही उल्लेखनीय मानले जाते.

COMMENTS