बंगळुरू : काँग्रेसचे राजकारण हे खोटेपणा, दिशाभूल आणि विश्वासघातावर आधारित आहे. तब्बल २५-३० वर्षांपासून मैत्री असलेल्या द्रमुकला (DMK) सोडून त्यां

बंगळुरू : काँग्रेसचे राजकारण हे खोटेपणा, दिशाभूल आणि विश्वासघातावर आधारित आहे. तब्बल २५-३० वर्षांपासून मैत्री असलेल्या द्रमुकला (DMK) सोडून त्यांनी टीव्हीकेसोबत (TVK) युती केली. काँग्रेस हा एक ‘परजीवी’ पक्ष असून त्याला विकास आणि सुशासनाशी काहीही देणे-घेणे नाही, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केली. देशातील जनता आता स्थैर्य, विकास आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभी राहत असल्याने भाजप आणि एनडीएला सातत्याने जनसमर्थन मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकातील बंगळुरू येथे आयोजित भव्य जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या कारभारावर निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेसच्या सत्ताकाळात सुशासनाला कधीही महत्त्व मिळाले नाही. निवडणुकांपूर्वी मोठी आश्वासने देऊन सत्तेत येणारा हा पक्ष नंतर जनतेचा विश्वासघात करतो. कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका करताना मोदी म्हणाले की, राज्यात विकासकामांपेक्षा अंतर्गत गटबाजी आणि सत्तासंघर्ष यामध्येच सरकारचा अधिक वेळ जात आहे. मुख्यमंत्रीपद कोणाकडे राहणार, यावरूनच सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू असल्यामुळे प्रशासनाची दिशा भरकटली असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.
तमिळनाडूतील परिस्थितीचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, काँग्रेस आपल्या मित्रपक्षांशीही प्रामाणिक राहत नाही. अनेक वर्षांची आघाडी असूनही सत्तेसाठी काँग्रेसने सहकारी पक्षांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. याउलट, भाजप सरकारसाठी जनकल्याण सर्वोच्च असून ‘सर्वांचा साथ, सर्वांचा विकास आणि सर्वांचा विश्वास’ या मंत्रावर सरकार काम करत आहे. गेल्या १२ वर्षांत पायाभूत सुविधा, उद्योग, शेती आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून देशात मोठे परिवर्तन घडल्याचे त्यांनी नमूद केले.
देशाला आता विकास हवा आहे
देशातील जनतेला आता घोटाळे नकोत, तर वेगवान विकास हवा आहे. केवळ घोषणाबाजी करणारे सरकार देशाला नको असून राष्ट्रहिताला सर्वोच्च मानणारे राजकारणच देशाला पुढे नेऊ शकते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्येही भाजपचा प्रभाव वाढत असल्याचे मोदी यांनी सांगितले.
शौर्य आणि बलिदान हीच देशाची ताकद
१० मे या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व सांगताना मोदी म्हणाले की, १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याची पहिली ठिणगी याच दिवशी पडली होती. भारताची शौर्य आणि बलिदानाची परंपरा हीच खरी ताकद आहे.

COMMENTS