Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उन्हाच्या तडाख्यात दिव्यांग विद्यार्थ्यांचे हाल; आदेश असूनही दीड महिना सकाळी शाळा नाही; नांदेडमधील विशेष शाळेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह; पालक, कर्मचारी आणि दिव्यांग संघटनांत संताप

नांदेड : जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 5 मार्च 2026 रोजी शाळा सकाळच्या सत्रात घेण्याच

राज्यात उष्णतेचा कहर; अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी
निलंग्यात उष्माघाताने शेतकऱ्याचा बळी! ४२ अंशांच्या तडाख्याने शेतातच दुर्दैवी अंत
निसर्गाचा इशारा की मानवी चूक?
R R Malpani Matimand Vidyalaya in Maganpura,Nanded - Best Schools near me  in Nanded - Justdial

नांदेड : जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 5 मार्च 2026 रोजी शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे स्पष्ट प्रशासकीय आदेश जारी करण्यात आले होते. मात्र, आदेश निघून दीड महिना उलटल्यानंतरही नांदेडमधील काही दिव्यांग शाळांनी त्याची अंमलबजावणी न केल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. त्यामुळे 40 अंशांपेक्षा अधिक तापमानात दिव्यांग विद्यार्थी, वस्तीगृहातील मुले तसेच रोज प्रवास करून येणार्‍या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागल्याची माहिती पुढे आली आहे.
मगनपुरा परिसरातील मालपाणी मूकबधिर विद्यालय येथे दीर्घकाळ शाळा दुपारच्या सत्रातच सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. कडक उन्हात दुपारच्या वेळेत शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली. उष्माघात, थकवा, निर्जलीकरण, चिडचिड, अशक्तपणा अशा समस्या निर्माण होण्याचा धोका असूनही प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्याबद्दल नाराजी वाढली आहे. या शाळेत कार्यरत विशेष शिक्षक आणि कर्मचारी वर्गालाही तीव्र उन्हाचा सामना करत अध्यापन करावे लागत होते. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सकाळच्या सत्रात शाळा सुरू करावी, अशी विनंती काही शिक्षक व कर्मचार्‍यांनी मुख्याध्यापकांकडे केली होती. मात्र, त्यांना समजून घेण्याऐवजी अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. काही दिव्यांग महिला व पुरुष कर्मचारी यांना कार्यालयातून हाकलण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकारामुळे शिक्षक व कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे.
वारंवार होणार्‍या अपमानास कंटाळून संबंधित कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकार्‍यांकडे आपली व्यथा मांडल्याचे समजते. त्यानंतर हा विषय अधिक गांभीर्याने पुढे आला. दिव्यांग हक्कांसाठी कार्यरत असलेले नेते राहुल साळवे यांनी प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, अविनाश देवशेटवार यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यानंतर तातडीने जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकार्‍यांशी संपर्क साधून सकाळच्या सत्राबाबत निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. यानंतर संबंधित शाळेत वेळेत बदल करण्यात आला असला, तरी उन्हाळी सुट्ट्या लागू होण्याच्या अगदी अंतिम टप्प्यात हा निर्णय घेण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. मार्च महिन्यात आदेश निघाले असताना एप्रिलच्या अखेरीस केवळ चार-पाच दिवसांसाठी सकाळचे सत्र सुरू करणे ही विद्यार्थ्यांच्या हिताशी केलेली टाळाटाळ असल्याची टीका पालकांकडून होत आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 तसेच दिव्यांग शाळा संहितेनुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची, सन्मानाची आणि सुलभ शिक्षणाची हमी देणे बंधनकारक आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संस्थांनी संवेदनशीलतेने कार्य करावे, अशी ठाम मागणी राहुल साळवे यांनी केली आहे.

COMMENTS