नांदेड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील काँग्रेसच्या काही ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष संघट

नांदेड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील काँग्रेसच्या काही ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेतील अलीकडील निर्णयप्रक्रियेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली. शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या धोंडे जेवणाच्या कार्यक्रमात पक्षाच्या संघटनात्मक रचनेपासून ते नेतृत्वाच्या कार्यपद्धतीपर्यंत विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
विशेषतः ‘संघटन सृजन’ मोहिमेनंतर करण्यात आलेल्या जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या नियुक्त्यांबाबत अनेक पदाधिकार्यांनी तीव्र आक्षेप नोंदविले. कार्यकर्त्यांच्या भावना आणि पक्षाच्या तळागाळातील अपेक्षांचा पुरेसा विचार न करता हे निर्णय घेतल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली. त्यामुळे भविष्यात पक्षाला राजकीय किंमत मोजावी लागू शकते, अशीही चिंता व्यक्त करण्यात आली. बैठकीत राज्य काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त करत, पक्षाच्या महत्त्वाच्या निवडणूक प्रक्रियांमध्ये स्थानिक व अनुभवी पदाधिकार्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तथापि, वैयक्तिक नाराजीपेक्षा पक्षाचे बळकटीकरण हेच ध्येय असल्याचे सांगत कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते महेश देशमुख तरोडेकर यांनी पक्षांतर्गत मतभेद असले तरी भाजपविरोधातील लढा हेच प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसची लोकशाही परंपरा आणि विचारस्वातंत्र्य हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे ते म्हणाले. कैलास गोडसे यांनीही संघर्ष आणि संयम ही काँग्रेस कार्यकर्त्यांची ओळख असल्याचे सांगत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिक चर्चा आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील नेतृत्वाभोवती निर्माण झालेल्या सल्लागार गटावर अप्रत्यक्ष टीका करत, सक्रिय कार्यकर्त्यांऐवजी काही मोजक्या व्यक्तींमार्फत पक्ष चालविला जात असल्याची भावना व्यक्त केली. संघटनात्मक निर्णयांमध्ये सर्वसमावेशकता नसल्यास त्याचे दुष्परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येऊ शकतात, असा इशाराही काही वक्त्यांनी दिला. दरम्यान, या बैठकीचे आयोजक बालाजी चव्हाण आणि केदार साळुंखे यांनी स्पष्ट केले की, संघटनात्मक नियुक्त्यांविषयी मांडलेले आक्षेप हे पक्षहिताच्या दृष्टीने असून कोणत्याही व्यक्तीविरोधातील भूमिका नाही. पक्ष अधिक सक्षम आणि कार्यकर्ताकेंद्रित व्हावा, यासाठीच दिल्लीपर्यंत पाठपुरावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. धोंडे जेवणाच्या निमित्ताने झालेल्या या अनौपचारिक संवादातून नांदेड काँग्रेसमधील तळागाळातील अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली असून, आगामी काळात प्रदेश नेतृत्व या नाराजीची कितपत दखल घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS