Homeताज्या बातम्या

जेजुरीच्या सर्वांगीण विकासासाठी सेंद्रिय हळद, भक्तनिवास आणि धार्मिक मार्गिकेची उभारणी आवश्यक : डॉ. नीलम गोऱ्हे

जेजुरी : जेजुरी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे श्रद्धास्थान असून या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सेंद्रिय हळदीचा (भंडारा) वापर, भाविकांसाठी सुसज्ज

कर्जतमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक; संघटनात्मक बांधणीसह आगामी निवडणुकांबाबत रणनीती
बिनागुंडाच्या जंगलातील माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; गडचिरोली पोलिसांचे मोठे यश
संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे; दिवसा १० तास विजेसाठी शिंदे सेनेचा सरकारला घरचा आहेर

जेजुरी : जेजुरी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे श्रद्धास्थान असून या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सेंद्रिय हळदीचा (भंडारा) वापर, भाविकांसाठी सुसज्ज निवास व्यवस्था आणि धार्मिक पर्यटनाला चालना देणारी विशेष मार्गिका (कॉरिडोअर) उभारणे आवश्यक असल्याचे मत शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

जेजुरी दौऱ्यादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी श्री खंडोबा मंदिरात विधिवत पूजा करून दर्शन घेतले. याप्रसंगी राज्यातील नागरिकांचे कल्याण, सामाजिक ऐक्य आणि जनहिताच्या विविध योजना अधिक वेगाने राबविण्यासाठी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि श्री खंडोबाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कोरोनाकाळात समाजोपयोगी कार्य केल्याबद्दल घडशी समाजाच्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला.

पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. गोऱ्हे यांनी जेजुरीतील सामाजिक परिवर्तनाचा उल्लेख केला. पूर्वी अस्तित्वात असलेल्या मुरळी प्रथेला आळा घालण्यासाठी झालेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. “धार्मिक परंपरांचा सन्मान राखून समाजसुधारणा घडवून आणता येते, याचे जेजुरी हे उत्तम उदाहरण आहे. धर्म आणि प्रगती हे एकमेकांच्या विरोधात नसून योग्य सुधारणा आणि लोकसहभागाच्या माध्यमातून सामाजिक विकास साधता येतो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जेजुरीची ओळख असलेल्या भंडाऱ्यात वापरल्या जाणाऱ्या हळदीबाबत डॉ. गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली. बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक मिश्रणयुक्त किंवा निकृष्ट दर्जाच्या हळदीमुळे भाविकांच्या त्वचेवर आणि डोळ्यांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. तसेच मंदिराच्या ऐतिहासिक दगडी वास्तूलाही अशा हळदीमुळे नुकसान पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले. देवस्थान प्रशासनाने सेंद्रिय आणि शुद्ध हळदीचा वापर वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच भाविकांना मोफत सेंद्रिय हळद उपलब्ध करून देण्याबाबत विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली.

जेजुरीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जतनासाठी योगदान म्हणून डॉ. गोऱ्हे यांनी श्री मार्तंड देवस्थानला २१ हजार रुपयांची देणगी धनादेशाद्वारे प्रदान केली. देवस्थानच्या मालमत्ता आणि जमिनीसंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून यामुळे विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

धार्मिक पर्यटनासाठी विशेष मार्गिकेची संकल्पना वाराणसीप्रमाणे जेजुरीतही धार्मिक पर्यटनाला चालना देणारी विशेष मार्गिका (कॉरिडोअर) विकसित करण्याची गरज असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. अशा प्रकल्पांमुळे भाविकांना अधिक सुविधा मिळतील, पर्यटनवाढीस चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, असे त्यांनी सांगितले. मात्र, कोणतेही विकासकाम राबविताना स्थानिक नागरिकांचा सहभाग, त्यांचा विश्वास आणि त्यांच्या भावना यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS