Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुटणारे संसार जोडणारे अर्धापूर केंद्र; 1 हजार 778 प्रकरणांत यशस्वी समेट

अर्धापूर : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला समुपदेशक स्मिता तरटे व गजानन चिंचोलकर यांनी गेल्या दीड दश

विद्यार्थ्यांच्या घासावरच चोरट्यांचा डल्लाखराब येथील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहार चोरीला
नांदेड-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; ट्रकचा टायर फुटून दुचाकीस्वार महिलेला गंभीर दुखापत
प्रचंड गरीबी, अल्पदृष्टी आणि वडिलांचे छत्र हरपले तरीही हार नाही; करण गायकवाड एमपीएससी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण

अर्धापूर : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला समुपदेशक स्मिता तरटे व गजानन चिंचोलकर यांनी गेल्या दीड दशकात कुटुंबसंस्थेला भक्कम आधार देत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सन 2012 पासून ते मार्च 2026 पर्यंत केंद्रात नोंद झालेल्या एकूण 2 हजार 149 प्रकरणांपैकी तब्बल 1 हजार 778 प्रकरणांमध्ये यशस्वी समेट घडवून पती-पत्नींचे संसार पुन्हा सुरळीत करण्यात केंद्राने मोलाची भूमिका बजावली आहे.
समुपदेशक स्मिता तरटे व गजानन चिंचोलकर यांच्या संयमी, संवेदनशील आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक संसार तुटण्याच्या उंबरठ्यावर आलेल्या कुटुंबांना नवसंजीवनी मिळाली आहे. उर्वरित प्रकरणांपैकी काहींनी कायदेशीर फारकत घेतली, काहींना न्यायालयामार्फत पोटगी मंजूर झाली, तर सध्या 22 प्रकरणांवर समुपदेशन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तरटे यांनी दिली आहे. या केंद्रात नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील महिलांना अर्ज करता येतो. येथे येणारी प्रकरणे विविध प्रकारची असतात, व्यसनाधीनता, विवाहबाह्य संबंध, परस्पर संशय, हुंड्याचे प्रश्न, आर्थिक वाद, स्वभावातील विसंगती आदी कारणांमुळे निर्माण झालेल्या कौटुंबिक तणावाचे स्वरूप गंभीर असते. मात्र या सर्व प्रकरणांमध्ये केवळ तडजोड घडवून आणण्यावर भर न देता, परस्पर संवाद वाढवणे, समजूतदारपणा निर्माण करणे आणि विश्वास पुनर्स्थापित करणे यावर केंद्रित पद्धतीने समुपदेशन केले जाते. समुपदेशन प्रक्रियेत प्रथम पती-पत्नी व दोन्ही कुटुंबांना एकत्र बोलावून प्राथमिक चर्चा केली जाते. त्यानंतर पीडित महिलेची स्वतंत्रपणे समजूत काढून तिच्या अडचणींचा सविस्तर आढावा घेतला जातो. कौटुंबिक हिंसाचार किंवा अन्य तक्रारींच्या अनुषंगाने अर्ज स्वीकारून संबंधित व्यक्तींना संपर्क साधला जातो. पुढे वैयक्तिक व संयुक्त समुपदेशनाच्या माध्यमातून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. यानंतर दोन्ही कुटुंबांची संयुक्त बैठक घेऊन सामंजस्याचा मार्ग काढला जातो. पती-पत्नींच्या स्वेच्छेने हमीपत्र लिहून घेतले जाते आणि समेटानंतरही केंद्रामार्फत नियमित पाठपुरावा केला जातो. महिन्यातून एकदा भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला जातो, तसेच गरजेनुसार मार्गदर्शन व मदतही केली जाते.
गुण्यागोविंदाने नांदताना पाहणे, हीच खरी कमाई- स्मिता तरटे
छोट्या-छोट्या कारणांमुळे पती-पत्नींत वाद निर्माण होतात; मात्र संवादाअभावी ते तीव्र होतात. अशा वेळी समुपदेशनातून त्यांना पुन्हा एकत्र आणून आनंदाने नांदताना पाहणे, यापेक्षा मोठे समाधान नाही, असे समुपदेशक स्मिता तरटे यांनी सांगितले. सध्या प्रलंबित असलेल्या 22 प्रकरणांमध्येही सकारात्मक बदल घडवून आणण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अर्धापूरचे महिला समुपदेशन केंद्र हे केवळ वाद मिटवण्यापुरते मर्यादित न राहता तुटणार्‍या नात्यांना सावरण्याचे आणि समाजात कुटुंबसंस्थेची वीण अधिक मजबूत करण्याचे कार्य करत आहे. या समर्पित सेवेमुळे केंद्राने अनेक कुटुंबांचे आयुष्य नव्याने उजळवले असून, समाजात सकारात्मकतेचा संदेश देत ‘आशेचा किरण’ म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याला सलाम करत, समाजातील विविध स्तरांतून समुपदेशक स्मिता तरटे व गजानन चिंचोलकर यांचे मनापासून अभिनंदन केले जात आहे.

COMMENTS