अहिल्यानगर: महाराष्ट्रातील एकल महिला, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित व निराधार महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र धोरण राबविणे, अंगणवाडी सेविका व म

अहिल्यानगर: महाराष्ट्रातील एकल महिला, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित व निराधार महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र धोरण राबविणे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या हक्कांचे संरक्षण करणे तसेच सुरक्षा क्षेत्रात महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीच्या ऍड. स्वाती जाधव यांच्या वतीने करण्यात आली आहे.
शनिशिंगणापूर येथे खासदार तथा शिवसेना नेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ऍड. स्वाती जाधव यांनी विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले.
स्वतंत्र सक्षमीकरण धोरण व मानधन वाढीची मागणी
सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील एकल महिलांना आर्थिक स्वावलंबन, सुरक्षितता, कौशल्य विकास, स्वयंरोजगार तसेच विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळण्यासाठी स्वतंत्र सक्षमीकरण व संरक्षण धोरण राबविण्यात यावे. यासोबतच, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात भरीव वाढ करून त्यांना सामाजिक सुरक्षा व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
महिलांना सुरक्षा क्षेत्रात रोजगाराचे प्राधान्य मिळावे
याशिवाय शासकीय, निमशासकीय, औद्योगिक, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि इतर सुरक्षा सेवांमध्ये महिलांना सुरक्षा रक्षक म्हणून प्राधान्याने रोजगार देण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवावी. महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना आवश्यक आधुनिक प्रशिक्षण, विमा संरक्षण आणि सुरक्षित कामकाजाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करावा व तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने व्यक्त करण्यात आली. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व्यापक प्रयत्न करणार असल्याचे देखील ऍड. स्वाती जाधव यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS