मेक्सिको : फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्यात इंग्लंडने यजमान मेक्सिकोचा 3-2 असा निसटता पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

मेक्सिको : फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्यात इंग्लंडने यजमान मेक्सिकोचा 3-2 असा निसटता पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पावसामुळे आणि प्रतिकूल हवामानामुळे जवळपास एक तास सामना थांबवावा लागला असला, तरी त्यानंतर रंगलेल्या या चुरशीच्या लढतीने प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवले. या विजयासह इंग्लंडने सलग तिसर्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. आता उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी इंग्लंडसमोर नॉर्वेचे आव्हान असणार आहे.
1966 नंतर पुन्हा विश्वविजेतेपद मिळवण्याचे स्वप्न बाळगलेल्या इंग्लंडने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. त्याचे फळ त्यांना पहिल्या सत्रात मिळाले. ज्यूड बेलिंगहॅमने अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरात 36 व्या आणि 38 व्या मिनिटाला दोन शानदार गोल करत इंग्लंडला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. या दुहेरी आघाडीमुळे इंग्लंडने सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र, यजमान मेक्सिकोने हार मानली नाही. पहिल्या सत्राच्या अखेरीस 42 व्या मिनिटाला ज्युलियन क्विनोनेसने अचूक फटका मारत गोल नोंदवला आणि संघाची पिछाडी 2-1 अशी कमी केली. या गोलमुळे मेक्सिकोच्या चाहत्यांमध्ये नव्याने उत्साह संचारला आणि सामना पुन्हा रंगतदार बनला. दुसर्या सत्रात सामन्याला वेगळेच वळण मिळाले. 54 व्या मिनिटाला इंग्लंडचा बचावपटू जॅरेल क्वानसाहने जेसस गॅलार्डोवर केलेल्या धडकेची चित्रफीत पंचांनी तपासली. त्यानंतर क्वानसाहला थेट लाल कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे उर्वरित सामना इंग्लंडला केवळ दहा खेळाडूंसह खेळावा लागला. एक खेळाडू कमी झाल्यानंतर इंग्लंडचे प्रशिक्षक थॉमस टुचेल यांनी तातडीने बचाव अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आक्रमक खेळाडू बुकायो साकाच्या जागी अनुभवी बचावपटू जॉन स्टोन्सला मैदानात उतरवले. या बदलामुळे इंग्लंडचा बचाव अधिक भक्कम झाला. दहा खेळाडूंवर आलेल्या इंग्लंडने बचावात्मक भूमिका न घेता आक्रमणही कायम ठेवले. मेक्सिकोचा गोलरक्षक राउल रँगेलने दंडक्षेत्रात अँथनी गॉर्डनला अडवल्याने इंग्लंडला दंडफटका मिळाला. या संधीचे सोने करत कर्णधार हॅरी केनने अचूक फटका मारून संघाचा तिसरा गोल नोंदवला आणि इंग्लंडची आघाडी 3-1 अशी वाढवली. यानंतर मेक्सिकोने पुन्हा एकदा पुनरागमनाचा प्रयत्न केला. 69 व्या मिनिटाला राऊल जिमेनेझने दंडफटक्यावर गोल करत सामना 3-2 असा केला. त्यानंतर संपूर्ण सामना मेक्सिकोने इंग्लंडच्या बचावावर जोरदार दबाव निर्माण केला. एक खेळाडू अधिक असूनही त्यांना इंग्लंडचा बचाव भेदण्यात यश आले नाही. अखेरच्या मिनिटांमध्ये मेक्सिकोने सातत्याने हल्ले चढवले, मात्र इंग्लंडच्या बचावफळीने संयम राखत प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरवला. त्यामुळे इंग्लंडने 3-2 अशी आघाडी कायम राखत सामना जिंकला आणि उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.

COMMENTS