शिवसेनेतील राजकीय घडामोडींनंतर चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बंडानंतर प्रथमच एका व्हिडिओच्या माध्यमातून

शिवसेनेतील राजकीय घडामोडींनंतर चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बंडानंतर प्रथमच एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण उद्धव ठाकरे यांच्यावर किंवा पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराज नसल्याचे स्पष्ट करत, मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या कामांसाठी सत्तेत जाणे अपरिहार्य ठरल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर मोठे प्रेम केले असून संजय राऊत यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते हे वडिलांसमान असल्याचे आष्टीकर म्हणाले. मात्र, 18 जूनपर्यंत आपण कुठेही जाण्याचा विचार केला नव्हता. त्यानंतर निर्माण झालेल्या अविश्वासाच्या वातावरणामुळे आणि काही वक्तव्यांच्या अतिरेकामुळे अनेकांनी नव्याने विचार करण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी नमूद केले. मतदारसंघातील विकासकामे, विविध विभागांतील प्रलंबित प्रश्न आणि निधीअभावी येणार्या अडचणी यांचा उल्लेख करत त्यांनी खासदार निधीतील पाच कोटी रुपये अपुरे पडत असल्याचे सांगितले. लोकांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिले असून त्यांची कामे करणे हे माझे कर्तव्य आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद, वन विभाग किंवा इतर कोणत्याही शासकीय यंत्रणेशी संबंधित प्रश्न सत्तेच्या पाठबळाशिवाय मार्गी लागत नव्हते. त्यामुळे विकासासाठी सत्तेत जाणे हीच कर्मप्राप्ती होती, असे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांत आपण निष्ठेने काम केले, मात्र कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने त्यांच्यामध्येही नाराजी वाढत होती. गेल्या 17 वर्षांत आपल्यासोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांना आपण कधीही वार्यावर सोडले नाही आणि पुढेही सोडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या निर्णयामुळे काही जण नाराज असतील, तर त्यांच्या भावना समजून घेत आपण विकासकामांच्या माध्यमातून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. मी शिवसेनेतून बाहेर गेलेलो नाही, शिवसेनेतच आहे. विचारधारा सोडलेली नाही आणि कधी सोडणारही नाही, असा पुनरुच्चार करत त्यांनी भावनिक भाषेत कार्यकर्त्यांना आपली साथ कायम ठेवण्याचे आवाहन केले. तुम्ही माझ्यासोबत आलात किंवा नाही आलात, तरी मी आयुष्यभर तुमच्या सोबत राहीन, असेही ते म्हणाले. दरम्यान, काही ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना संयमाचे आवाहन केले. मतभेद असू शकतात, माझ्यावर राग व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; मात्र असंवैधानिक भाषा किंवा कृती टाळली पाहिजे. शब्द हे शस्त्रापेक्षाही अधिक घातक असतात. एकदा तुटलेली मने पुन्हा जोडणे कठीण असते, असे सांगत त्यांनी सौहार्दाचे आवाहन केले. संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. मात्र, जोडण्याइतकीच तोडण्याची ताकदही प्रत्येकाकडे असते. त्यामुळे कुणीही भावना भडकवणार्या किंवा असंवैधानिक मार्गाचा अवलंब करू नये, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. या व्हिडिओमुळे पक्षांतरानंतर प्रथमच खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपली भूमिका सार्वजनिकपणे मांडली असून, विकास, निधी आणि सत्तेची गरज या मुद्द्यांच्या आधारे त्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा नांदेडसह हिंगोली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आगामी काळात त्यांच्या भूमिकेला कार्यकर्ते आणि मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS