परळी वैजनाथ शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून संत भगवान बाबा चौक ते तहसील कार्यालयाकडे जाणार्या रस्त्यावर एका थार गाडीने प्रशांत प्रल्हाद दे

परळी वैजनाथ शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून संत भगवान बाबा चौक ते तहसील कार्यालयाकडे जाणार्या रस्त्यावर एका थार गाडीने प्रशांत प्रल्हाद देशमुख यांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेनंतर थार चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून देशमुख कुटुंबीयांनी ही घटना केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक केलेला जीवघेणा हल्ला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या फुटेजमध्ये संबंधित थार गाडी कैद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. फुटेजच्या आधारे वाहन चालकाने संशयास्पद पद्धतीने वाहन चालवत मागून धडक दिल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. देशमुख कुटुंबीयांनी पोलिसांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असताना आरोपीला तातडीने अटक करावी आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांकडूनही करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे परळीकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS