सोशल मीडियाचा विळखा !मुलांच्या हातात आज खेळणी कमी आणि भ्रमणध्वनी अधिक दिसतो. मैदानावर धावणारे, मित्रांसोबत गप्पा मारणारे, पुस्तकांच्या पानांत रमण

सोशल मीडियाचा विळखा !
मुलांच्या हातात आज खेळणी कमी आणि भ्रमणध्वनी अधिक दिसतो. मैदानावर धावणारे, मित्रांसोबत गप्पा मारणारे, पुस्तकांच्या पानांत रमणारे बालपण आता छोट्या पडद्यावर अंगठा फिरवण्यात हरवताना दिसत आहे. सामाजिक माध्यमांनी जग जवळ आणले, संवादाची साधने वाढवली आणि माहितीचा महासागर खुला केला; परंतु त्याच माध्यमांचा अतिरेक मुलांच्या मनावर कोणत्या प्रकारचे परिणाम करीत आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. अमेरिकेतील न्यू मेक्सिको न्यायालयाने मेटा कंपनीवर तब्बल 5400 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याच्या घटनेने या प्रश्नाला पुन्हा एकदा जागतिक पातळीवर ऐरणीवर आणले आहे.
न्यायालयाने कंपनीने मुलांना आणि किशोरांना दीर्घकाळ सामाजिक माध्यमांवर गुंतवून ठेवतील, अशा प्रकारची वैशिष्ट्ये विकसित केल्याचे नमूद केले. त्याचबरोबर मुलांना आभासी जगातील शोषण आणि अन्य धोक्यांपासून पुरेसे संरक्षण देण्यात कंपनी अपयशी ठरल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे सामाजिक माध्यमांच्या व्यसनामुळे होणारे मानसिक नुकसान आणि त्यातून निर्माण होणारा सामाजिक परिणाम हा सार्वजनिक उपद्रवाच्या स्वरूपात पाहण्याचा न्यायालयाचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. मार्चमध्येही मेटावर मोठा दंड ठोठावण्यात आला होता. म्हणजेच प्रश्न एका कंपनीपुरता मर्यादित राहिलेला नाही; डिजिटल जगाच्या संपूर्ण व्यवसायपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामाजिक माध्यमांवरील वापरकर्त्यांचा वेळ वाढला की त्यातून कंपन्यांना आर्थिक फायदा होतो. त्यामुळे वापरकर्ता किती वेळ पडद्यावर राहील, त्याचे लक्ष कशाने वेधले जाईल आणि तो पुन्हा पुन्हा त्या माध्यमाकडे कसा वळेल, याचा विचार करणारी यंत्रणा तयार झाली आहे. मोठ्या माणसाला या मोहातून स्वतःला बाहेर काढणे कधीकधी शक्य होते; परंतु ज्यांचे व्यक्तिमत्त्व अद्याप घडत आहे, ज्यांच्या भावनिक क्षमता विकसित होत आहेत, अशा मुलांना या आकर्षणाचा प्रतिकार करणे किती कठीण असेल, याची कल्पना करणे अवघड नाही. मुलांच्या मनाला सर्वाधिक प्रभावित करणार्या गोष्टींपैकी एक म्हणजे स्वतःची इतरांशी तुलना. छायाचित्रे आणि चलतचित्रांच्या माध्यमातून सादर केले जाणारे तथाकथित सुंदर, यशस्वी आणि आनंदी जीवन मुलांच्या मनावर खोल परिणाम करते. प्रत्यक्ष जीवनात प्रत्येक व्यक्तीचे रूप, शरीरयष्टी, परिस्थिती आणि क्षमता वेगवेगळी असते. मात्र सामाजिक माध्यमांवर गाळणी लावलेल्या प्रतिमा, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने बदललेल्या चेहर्यांचे प्रदर्शन आणि अतिशय काळजीपूर्वक निवडलेले क्षण यामुळे वास्तवाचे भ्रामक चित्र मुलांसमोर उभे राहते.
विशेषतः मुलींमध्ये स्वतःच्या शरीराविषयी न्यूनगंड निर्माण होण्याचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सतत एखाद्या विशिष्ट प्रकारच्या सौंदर्याचे प्रदर्शन डोळ्यांसमोर राहिल्याने स्वतःचे रूप अपुरे असल्याची भावना निर्माण होऊ शकते. चेहरा, त्वचा, वजन, उंची, शरीरयष्टी अशा प्रत्येक बाबतीत स्वतःची तुलना इतरांशी होऊ लागते. ‘मी अशी का दिसत नाही?’ हा प्रश्न हळूहळू ‘माझ्यातच काहीतरी कमी आहे’ या न्यूनगंडात बदलतो. बालपण आणि किशोरावस्था ही व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची नाजूक अवस्था असल्याने त्याचे परिणाम अधिक गंभीर असू शकतात. यातून खाण्याशी संबंधित विकार निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. कमी खाणे, अति खाणे, वजनाबद्दल अतिरेकी चिंता करणे किंवा शरीराच्या आकाराबाबत अस्वस्थ राहणे यांसारख्या समस्या वाढू शकतात. काही मुलांमध्ये नैराश्य, एकाकीपणा, असुरक्षितता आणि स्वतःला इजा करण्याच्या प्रवृत्तीपर्यंत परिस्थिती जाऊ शकते. प्रत्येक मुलावर सामाजिक माध्यमांचा परिणाम सारखाच होईल, असे नाही; परंतु जोखीम वाढत असेल, तर पालक, शाळा, समाज आणि शासन यांनी त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. सामाजिक माध्यमांचा अतिरेक केवळ मानसिक आरोग्यावर परिणाम करतो असे नाही, तर जीवनशैलीही बदलतो. रात्री उशिरापर्यंत भ्रमणध्वनीवर राहणे, झोपेचा वेळ कमी होणे, सकाळी उठण्यास त्रास होणे, अभ्यासात लक्ष न लागणे, मैदानी खेळ कमी होणे, प्रत्यक्ष मित्रमैत्रिणींशी संवाद घटणे आणि कुटुंबातील सदस्यांपासून मानसिक अंतर वाढणे, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम मुलांच्या विकासावर होतो. घरात चार माणसे असतात; पण प्रत्येकाच्या हातात स्वतंत्र पडदा असतो. एकाच छताखाली राहूनही संवाद हरवतो, ही आधुनिक काळाची शोकांतिका आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे सामाजिक माध्यमांवरील प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक माहिती विश्वासार्ह नसते. मुलांना फसवणूक, छळ, लैंगिक शोषण, दिशाभूल करणारी माहिती आणि मानसिक दबाव यांसारख्या धोक्यांना सामोरे जावे लागू शकते. आभासी जगात समोरची व्यक्ती कोण आहे, तिचा हेतू काय आहे आणि ती दिलेली माहिती खरी आहे का, हे ओळखण्याची क्षमता लहान मुलांमध्ये पुरेशी विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांना डिजिटल सुरक्षिततेचे शिक्षण देणे ही काळाची गरज बनली आहे. मात्र या संपूर्ण प्रश्नाचे खापर केवळ तंत्रज्ञानावर फोडून पालकांची आणि समाजाची जबाबदारी संपत नाही. मुलांना भ्रमणध्वनी देऊन मोकळे होणे ही पालकांची सोय असू शकते; पण त्यातून मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण होत नाहीत. मुलांना वेळ हवा असतो, संवाद हवा असतो, कौतुक हवे असते, खेळण्यासाठी जागा हवी असते आणि अपयश आले तरी त्यांना स्वीकारणारे वातावरण हवे असते. हे सर्व देण्याऐवजी त्यांच्या हातात पडदा देणे हा समस्येवरचा उपाय नाही.
शाळांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. अभ्यासक्रमात डिजिटल साक्षरतेसोबत डिजिटल संयमाचे शिक्षण आवश्यक आहे. सामाजिक माध्यमांचा वापर कसा करावा, चुकीची माहिती कशी ओळखावी, अनोळखी व्यक्तींशी संवादाचे धोके कोणते, स्वतःचे छायाचित्र किंवा वैयक्तिक माहिती सार्वजनिक करण्याचे परिणाम काय असू शकतात, तसेच सामाजिक माध्यमांवरील तुलना मानसिक आरोग्यासाठी का धोकादायक आहे, याची माहिती मुलांना दिली पाहिजे. शासनानेही केवळ कंपन्यांवर दंड आकारून थांबता कामा नये. मुलांसाठी सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करण्यासाठी स्पष्ट नियम, प्रभावी देखरेख आणि कंपन्यांच्या उत्तरदायित्वाची कठोर व्यवस्था आवश्यक आहे. अल्पवयीन वापरकर्त्यांचा वेळ वाढवण्यासाठी जाणूनबुजून तयार केलेल्या यंत्रणांवर नियंत्रण असले पाहिजे. मुलांच्या सुरक्षिततेपेक्षा नफा मोठा ठरू नये, हा मूलभूत सिद्धांत डिजिटल अर्थव्यवस्थेने स्वीकारला पाहिजे. सामाजिक माध्यमे पूर्णपणे वाईट आहेत, असा निष्कर्षही योग्य नाही. ज्ञान, शिक्षण, सर्जनशीलता, संवाद, व्यवसाय आणि सामाजिक जनजागृतीसाठी त्यांचा मोठा उपयोग होतो. प्रश्न माध्यमांचा नाही; प्रश्न आहे तो वापराच्या मर्यादेचा आणि वापरकर्त्याच्या वयाचा. साधन माणसासाठी असते; माणूस साधनासाठी नाही. जेव्हा भ्रमणध्वनी आपल्या वेळेवर, झोपेवर, भावनांवर आणि विचारांवर नियंत्रण ठेवू लागतो, तेव्हा सावध होण्याची वेळ आलेली असते. आज मुलांना ‘भ्रमणध्वनी सोड’ असे सांगण्यापेक्षा ‘भ्रमणध्वनीपेक्षा आयुष्य मोठे आहे’ हे शिकवण्याची गरज आहे. त्यांना मैदान द्यावे लागेल, पुस्तके द्यावी लागतील, कला आणि छंदांची संधी द्यावी लागेल, कुटुंबातील संवाद वाढवावा लागेल.

COMMENTS