नवी दिल्ली: एफआयएच (FIH) पुरुष हॉकी वर्ल्ड कप २०२६ पूर्वी भारतीय हॉकी संघाच्या जर्सीवरून एक मोठा राजकीय व सामाजिक वाद निर्माण झाला आहे. भारतीय हॉ

नवी दिल्ली: एफआयएच (FIH) पुरुष हॉकी वर्ल्ड कप २०२६ पूर्वी भारतीय हॉकी संघाच्या जर्सीवरून एक मोठा राजकीय व सामाजिक वाद निर्माण झाला आहे. भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा पारंपरिक निळा (ब्लू) रंग बदलून आता भगवा (ऑरेंज) करण्यात आला आहे. हॉकी इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर भारतीय संघाची ही नवीन भगवी जर्सी जाहीर केल्यानंतर यावर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार विरेन रासकिन्हा याने या निर्णयावर जोरदार टीका करत गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
नेमका काय आहे वाद?
ऑगस्ट २०२६ मध्ये बेल्जियम आणि नीदरलँड येथे संयुक्तपणे हॉकी वर्ल्ड कपचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने भारतीय पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांसाठी भगव्या रंगाची जर्सी लाँच केली. जर्सीचा रंग बदलताच माजी कर्णधार विरेन रासकिन्हाने सोशल मीडियावर पोस्ट करत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, “हॉकी इंडियाने भारतीय हॉकीसाठी खूप चांगले काम केले आहे, पण जर्सीचा रंग बदलण्याचा हा निर्णय अत्यंत लाजीरवाणा आहे. भारतीय संघाची ओळख ही नेहमीच ‘मॅन इन ब्लू’ अशी राहिलेली आहे. मी स्वतः अनेक वर्षे अत्यंत अभिमानाने ही निळी जर्सी घातली आहे. चाहतेही भारतीय खेळाडूंना नेहमी निळ्या रंगातच पाहू इच्छितात. मग अचानक या ऑरेंज रंगाचा काय लॉजिक आहे?”
हॉकी इंडियाने काय दिले स्पष्टीकरण?
जर्सीवरून सुरू झालेल्या वादानंतर हॉकी इंडियाने यावर आपली अधिकृत बाजू स्पष्ट केली आहे. हॉकी इंडियानुसार, जर्सीचा रंग निळ्यावरून भगवा करण्याचा निर्णय हा भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्या शिफारसीनुसार घेण्यात आला आहे. खेळाडू आणि कोचिंग स्टाफला या नव्या भगव्या रंगाबद्दल कोणतीही तक्रार किंवा अडचण नाही. उलट भारतीय खेळाडू या नव्या जर्सीमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे उत्सुक आणि तयार आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे.
१९७५ नंतर दुसरा चषक जिंकण्याची मोठी संधी
भारतीय हॉकी संघाने १९७५ मध्ये एकमेव वर्ल्ड कप जिंकला होता. आता २०२६ मध्ये हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाकडे ५१ वर्षांनंतर दुसऱ्यांदा जगज्जेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी असेल. नव्या भगव्या जर्सीत उतरणारा भारतीय संघ या वर्ल्ड कपमध्ये कशी कामगिरी करतो आणि या वादावर पडदा पडतो का, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS