नवभारताचे शिल्पकार !

Homeअहमदनगरमुंबई - ठाणे

नवभारताचे शिल्पकार !

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. तर संविधान देशात लागू होऊन देखील 75 वर्षांचा काळ लोटला आहे. या 75 वर्षांमध्ये भारताची प

प्रवाशांना स्वच्छ पाणी देणे ही काळाची गरज : कोयटे 
संजीवनी फार्मसीच्या १२ विद्यार्थ्यांना नोकरी 
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना


भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. तर संविधान देशात लागू होऊन देखील 75 वर्षांचा काळ लोटला आहे. या 75 वर्षांमध्ये भारताची प्रगती दैदिप्पमान अशीच राहिली आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आणि संविधानाची निर्मिती काळखंड यामध्ये त्या यशाची बीजे रोवलेली आहेत. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवळ देशापुरती मर्यादित राहिलेली नाही; ती जगभर साजरी होणारा एक विचारोत्सव ठरली आहे. कारण बाबासाहेब हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते नवभारताचे शिल्पकार होते. हजारो वर्षे शोषण, अन्याय आणि उपेक्षा सहन करणार्‍या समाजाला त्यांनी केवळ आवाज दिला नाही, तर त्या आवाजाला न्याय देणारी व्यवस्था उभी केली. त्यांच्या कार्याचा व्यासपीठ म्हणजे भारतीय राज्यघटना, तर त्यामागची प्रेरणा होती समता, स्वातंत्र्य आणि बंधूता ही मूलभूत तत्त्वे.
भारतातील सामाजिक रचना शतकानुशतके विषमतेवर आधारलेली होती. एका मोठ्या समाजघटकाला माणूस म्हणूनही जगण्याचा अधिकार नाकारण्यात आला होता. पिण्याच्या पाण्यापासून ते शिक्षणापर्यंत, आरोग्यापासून ते मंदिरप्रवेशापर्यंत सर्वच ठिकाणी भेदभाव होता. अशा काळामध्ये बाबासाहेबांनी संघर्षाचा मार्ग निवडला. महाड येथील चवदार तळे सत्याग्रह असो किंवा नाशिकमधील काळाराम मंदिर सत्याग्रह, या प्रत्येक चळवळीने समाजमनाला हादरा दिला. या आंदोलनांनी केवळ हक्कांची मागणी केली नाही, तर माणुसकीच्या मूल्यांची पुनर्स्थापना केली. बाबासाहेबांचे खरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी संघर्ष आणि रचनात्मक कार्य यांचा समतोल साधला. आंदोलनातून समाजाला जागवताना त्यांनी संविधानाच्या माध्यमातून त्या जागृतीला कायदेशीर आधार दिला. भारतीय राज्यघटना ही केवळ कायद्यांचा दस्तऐवज नसून, ती सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवणारी जीवनदृष्टी आहे. समानतेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य-या सर्व तरतुदींच्या माध्यमातून त्यांनी वंचितांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दिला. परंतु बाबासाहेबांचे कार्य केवळ सामाजिक न्यायापुरते मर्यादित नव्हते. अर्थशास्त्र, कायदा, कामगार हक्क, शेती, जलव्यवस्थापन, धर्मचिंतन-अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी मूलगामी विचार मांडले. कामगारांना आठ तासांचा कामांचा दिवस, महिलांना प्रसूती लाभ, औद्योगिक कायदे यांसारख्या सुधारणा त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहेत. त्यांनी कामगार आणि शेतकरी या दोन्ही घटकांना राष्ट्राच्या प्रगतीचे आधारस्तंभ मानले. शेतीविषयक त्यांच्या विचारांमध्ये शेतकर्‍यांच्या स्वावलंबनाला प्राधान्य होते. शेतकर्‍याला योग्य दर मिळावा, त्याच्या उत्पादनाला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी ब्रिटिश सत्तेसमोर ठामपणे मांडणी केली. कोकणातील खोती पद्धतीविरोधातील त्यांचा संघर्ष हा शेतकरी मुक्तीचा महत्त्वाचा टप्पा ठरला. 1929 मध्ये आयोजित शेतकरी परिषद आणि त्यानंतर 1937 मध्ये सादर केलेले विधेयक या माध्यमातून त्यांनी शोषणाविरुद्ध लढा उभारला. 1938 मध्ये हजारो शेतकर्‍यांचा मोर्चा काढून त्यांनी शासनाला शेतकरी प्रश्‍नांकडे गांभीर्याने पाहण्यास भाग पाडले.
जलव्यवस्थापन हा त्यांच्या कार्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. भारतातील शेती पावसावर अवलंबून असल्याची जाणीव ठेवून त्यांनी पाण्याच्या नियोजनावर भर दिला. मोठ्या धरणांची संकल्पना, जलसंपत्तीचे समन्यायी वाटप, सिंचन व्यवस्थेचा विकास-या सर्व बाबींमध्ये त्यांचे योगदान लक्षणीय आहे. भाक्रा-नांगल, हिराकूड यांसारख्या प्रकल्पांच्या संकल्पनांमध्ये त्यांच्या विचारांची छाप दिसून येते. त्यामुळेच त्यांना जलतज्ज्ञ म्हणूनही ओळखले जाते. बाबासाहेबांनी मांडलेली शेती आणि उद्योग यांची सांगड आजही तितकीच महत्त्वाची आहे. त्यांनी शेतीचे राष्ट्रीयीकरण, जमिनीचे योग्य वितरण, आणि औद्योगिकीकरणाचा संतुलित विकास यावर भर दिला. त्यांच्या मते, देशाची खरी प्रगती ही ग्रामीण आणि शहरी भागातील समतोल विकासावर अवलंबून असते. आजच्या काळात शेतकरी आत्महत्यांसारख्या समस्या पाहता, त्यांच्या विचारांची प्रासंगिकता अधिक ठळकपणे जाणवते. धर्म आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही बाबासाहेबांनी माणुसकीला केंद्रस्थानी ठेवले. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून समता, करुणा आणि विवेक यांचा संदेश दिला. त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाने लाखो लोकांना नवा आत्मविश्‍वास आणि नवी ओळख मिळाली. हा निर्णय केवळ धार्मिक नव्हता, तर सामाजिक क्रांतीचा एक भाग होता. आज बाबासाहेबांची जयंती साजरी करताना केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरते मर्यादित राहणे योग्य ठरणार नाही. त्यांच्या विचारांचे आचरण हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल. संविधानातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी, सामाजिक समतेची जपणूक, शिक्षणाचा प्रसार आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार-या सर्व गोष्टींची आज अधिक गरज आहे. दुर्दैवाने, अनेकदा संविधानातील मूल्यांची अंमलबजावणी अपुरी राहते, आणि त्यामुळे विषमता टिकून राहते. बाबासाहेबांनी दिलेली दिशा स्पष्ट आहे-शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही केवळ घोषवाक्ये नसून, ती जीवनाची तत्त्वे आहेत. शिक्षणामुळे जागृती येते, संघटनामुळे ताकद मिळते आणि संघर्षामुळे परिवर्तन घडते. या त्रिसूत्रीचा स्वीकार केल्यासच समाज खर्‍या अर्थाने प्रगत होऊ शकतो. आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात बाबासाहेबांचे विचार अधिकच मार्गदर्शक ठरतात. तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाच्या युगातही सामाजिक समतेचा प्रश्‍न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. त्यामुळे बाबासाहेबांचा विचार हा केवळ इतिहासाचा भाग नसून, तो वर्तमान आणि भविष्य घडवणारा आधार आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला आज जयंतीदिनी विनम्र अभिवादन करताना, त्यांच्या कार्याची व्यापकता आणि विचारांची खोली लक्षात घेणे आवश्यक आहे. बाबासाहेबांनी घडवलेला भारत केवळ कायद्याने नव्हे, तर मूल्यांनी उभा आहे. त्या मूल्यांची जपणूक आणि अंमलबजावणी हीच खरी कृतज्ञता ठरेल.

COMMENTS