Homeताज्या बातम्या

सीसीटीव्हीचा ‘डोळा’ महिनाभरापासून बंद; शोभानगरातील स्टडी पॉईंटमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न

नांदेड : शोभानगर परिसरातील नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील डॉ. शंकरराव चव्हाण स्टडी पॉईंट येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बसव

स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी-खांडे पारगाव शेतरस्ता; ५० वर्षांचा प्रश्न मार्गी
बीडच्या कारागृहात गैरप्रकार; खा.बजरंग सोनवणेंची थेट गृहमंत्री शहांकडे तक्रार दिल्लीत शहांची भेट घेवून केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी, गृहमंत्र्यांकडून योग्य कारवाईचे आश्वासन
पल्स पोलिओ मोहिमेला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद; महानगरपालिकेच्या २८ केंद्रांवर लसीकरण, रेल्वे स्थानकावरही डोस

नांदेड : शोभानगर परिसरातील नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील डॉ. शंकरराव चव्हाण स्टडी पॉईंट येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचा डिस्प्ले तब्बल महिनाभरापासून बंद असल्याची बाब समोर आली आहे. दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी या अभ्यासिकेत येत असताना सुरक्षा व्यवस्थेतील हा महत्त्वाचा दुवा बंद असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

स्पर्धा परीक्षा, महाविद्यालयीन शिक्षण तसेच विविध शैक्षणिक परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हा स्टडी पॉईंट महत्त्वाचे अभ्यासकेंद्र ठरला आहे. विशेषतः विद्यार्थिनींची मोठी उपस्थिती असलेल्या या ठिकाणी सुरक्षित आणि निर्भय वातावरण निर्माण करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचा डिस्प्लेच बंद असल्याने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी प्रकर्षाने जाणवत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर त्यांची नियमित देखभाल आणि प्रत्यक्ष निरीक्षण व्यवस्था कार्यरत ठेवणे तितकेच आवश्यक असते. एखादी अनुचित घटना घडल्यास तिची नोंद, संशयास्पद हालचालींचे निरीक्षण किंवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही महत्त्वाची भूमिका बजावते.

त्यामुळे महिनाभरापासून डिस्प्ले बंद असूनही त्याची दुरुस्ती न होणे ही बाब गंभीर मानली जात आहे. याबाबत विजय सरोदे यांनी माहिती देताना सीसीटीव्ही डिस्प्ले गेल्या महिन्यापासून बंद असल्याचे सांगितले. तर गोविंद मुंडकर यांनी या समस्येची माहिती महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. केवळ बंद डिस्प्ले सुरू करणे पुरेसे नसून संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त डिस्प्ले आणि कॅमेरे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी. तसेच या प्रभागातील नगरसेवकांनीही केवळ आश्वासन न देता स्टडी पॉईंटला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुविधा उपलब्ध करून देणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांना सुरक्षित वातावरण देणेही आवश्यक आहे. त्यामुळे सीसीटीव्हीचा बंद पडलेला ‘डोळा’ तातडीने सुरू करून संपूर्ण सुरक्षा व्यवस्था सक्षम करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS