Homeताज्या बातम्यासंपादकीय

इंडिया आणि वास्तव

देशात आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती सर्वच पक्षांकडून आखण्यात येत आहे. त्यातच विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केल्यानंतर सत्ताधार्‍यांसमोर इंडि

ग्रामपंचायत निवडणुकीचे कल
काँग्रेस मधील बेबंदशाही
कल्याणकारी व्यवस्थेचा अभाव !

देशात आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती सर्वच पक्षांकडून आखण्यात येत आहे. त्यातच विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केल्यानंतर सत्ताधार्‍यांसमोर इंडियाविरुद्ध लढण्याचे मोठे संकट निर्माण झाले. त्यानंतर इंडिया हा शब्दच हटवण्याच्याच हालचाली सुरू झाल्या. आणि त्याची सुरूवात राष्ट्रपती भवनाच्या पत्रावरून प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी पे्रेसिडेंट ऑफ भारत असे शब्द वापरून मोदी सरकारने इंडिया हा शब्द हद्दपार करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र इंडिया हे नाव ब्रिटीशांनी दिल्याचा दावा केला असला तरी इंडिया हा शब्द मूळच्या लॅटीन भाषेतून आला आहे. इंडिया नावाबद्दल सांगायचे झाल्यास या शब्दाचा उगम हा लॅटीन भाषेत सापडतो. इंडस या पर्शियन नावाने सिंधू नदी ओळखळी जायची. याच नदीच्या आजूबाजूचा परिसर या अर्थाने सिंधू नदीच्या पूर्वेकडील भूभागाला ग्रीक आणि पर्शियन लोकांनी इंडिया असे नाव दिल्याचे सांगितले जाते. नंतर हळूहळू सिंधू नदीपासून ते पूर्व आणि दक्षिणेपर्यंतच्या भूभागाला इंडिया नावाने संबोधले जाऊ लागल्याचे सांगण्यात येते. मात्र आता या शब्दाला विरोध होतांना दिसून येत आहे. इंडिया हा शब्द भारतीय संविधानाने स्वीकारला आहे. त्यामुळे इंडिया शब्द वगळल्यामुळे काय फरक पडणार आहे हा महत्वाचा प्रश्‍न आहे. भारतीय संविधानाने कलम 1 नुसार इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे स्वीकारलेली आहेत. त्यामुळे इंडिया नाव हटवण्यासाठी संसदेत घटनादुरुस्ती करावी लागणार आहे. तसेच या घटनादुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देखील दिले जावू शकते, त्याचे पुन्हा एकदा न्यायालयीन पुनर्विलोकन होईल यात शंका नाही. मात्र इंडिया हा वसाहतावादाचे प्रतीक आहे, गुलामीचे प्रतीक आहे, असा साक्षात्कार इंडिया आघाडीची स्थापना झाल्यानंतर अनेकांना झाला आहे. मात्र देश स्वातंत्र्य होवून 75 वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर मात्र कुणीही विरोध केला नाही. तत्कालीन संविधान सभेमध्ये हिंदू परिषदेसह अनेक नेत्यांचा समावेश होता, तेव्हा त्यांनी तेवढा तीव्रतेने विरोध केला नाही, मग आताच विरोध कशापायी ? हा महत्वाचा मुद्दा आहे. खरंतर अनेक विद्वानांच्या मते, इंडिया हा शब्दसुद्धा सिंधू संस्कृतीतून आला आहे. हे इंग्रजीत इंडस व्हॅली म्हणून ओळखले जात असे. काही इतिहासकारांच्या मते, इंडस हा शब्दामध्ये सुधारणा करीत भारत इंडिया बनला आणि नंतर तो इंडिया म्हणून ओळखला गेला. काही लोकांचे म्हणणे आहे की जेव्हा ब्रिटिश भारतात आले त्यावेळी आपल्या देशाला हिंदुस्थान म्हटले जात असे. हा शब्द बोलण्यात त्यांना अवघड जात होते. ब्रिटिशांना जेव्हा कळले की लॅटिन भाषेत भारत या शब्दाला इंडिया म्हणतात तेव्हा त्यांनी भारताला इंडिया म्हणून संबोधण्यास सुरवात केली, असा अनेकांचा मतप्रवाह आहे. खरंतर हिंदू हा शब्द देखील सिंधू संस्कृतीतून उदयाला आलेला आहे. आणि त्यातूनच सिंधू खोरे म्हणजे इंडस खोरे यातूनच इंडिया या शब्दांचा अपभ्रंश झाल्याचा दावा अनेक तत्वज्ञानांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे इंडिया हा शब्द कुणाच्या गुलामी मानसिकतेचे प्रतीक असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. सन 1949 मध्ये देशाची राज्यघटना तयार करण्यात आली होती. 17 सप्टेंबर 1949 रोजी युनियनच्या नावे व राज्ये यावर चर्चा सुरू झाली. घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली भूमिका विशद केली. परंतु इंडिया आणि भारत सारख्या शब्दांमधील संबंध समजून घेण्यास इच्छुक असलेल्या इतर सदस्यांमध्ये नावाबद्दल मतभेद होते. यावर बरेच वादविवाद झाले आणि सेठ गोविंद दास, कमलापती त्रिपाठी, श्रीराम सहाय, हरगोबिंद पंत, हरी विष्णू कामथ या नेत्यांनी या चर्चेत भाग घेतला. हरि विष्णू कामथ यांनी सुचवले की इंडिया अर्थात भारतला भारत किंवा इंडिया मध्ये रूपांतरीत करण्यात यावे. आणि त्यानुसार दोन्ही नावे स्वीकारण्यात आली. त्यानंतर आता इंडिया नाव हटवून भारत असे करण्याचा प्रस्ताव समोर येत आहे. त्यामुळे या शब्दाला विरोध करणे जसे चुकीचे आहे, तसेच त्याचे समर्थन करणेही चुकीचे आहे. त्यामुळे नाव बदलून परिस्थिती बदलणारी नाही. किंवा त्यामुळे फार काही फरक पडेल असे नाही. 

COMMENTS