बीड : शहरातील धोंडीपुरा भागातील भाजप नगरसेविका भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या कथित भ्याड हल्ल्या

बीड : शहरातील धोंडीपुरा भागातील भाजप नगरसेविका भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या कथित भ्याड हल्ल्यानंतर, त्यांच्यासह कुटुंबीयांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
भाजपचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. 16) पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेऊन या प्रकरणी निवेदन सादर केले. यावेळी देशपांडे कुटुंबीयांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे हे खोटे असून ते तत्काळ मागे घ्यावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली. शिष्टमंडळाच्या म्हणण्यानुसार, सागर देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला हा राजकीय वैमनस्यातून घडला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर सागर देशपांडे तसेच त्यांचे वडील अरुणराव देशपांडे यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले असून ते अन्यायकारक असल्याचे भाजप पदाधिकार्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचेही शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. तरीही अद्याप योग्य कारवाई झाली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. या शिष्टमंडळात भाजप शहराध्यक्ष अशोक लोढा, संपादक दिलीप खिस्ती, ज्येष्ठ पत्रकार महेश वाघमारे, नगरसेवक जगदीश गुरखुदे, शुभम धूत, डॉ. रविंद्र घुंबरे, अॅड. संगीता धसे, अॅड. दीपक कुलकर्णी, प्रमोद पुसरेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली असून न्याय मिळेल, असा विश्वास डॉ. योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS