आता कट्टा…अडीच वर्षांचे उट्टे फेडणार?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता कट्टा…अडीच वर्षांचे उट्टे फेडणार?

जिल्ह्याचे राजकारण बदलणार, स्थानिक स्वराज्य संस्थांवरही परिणाम

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यात सत्ताबदल झाला व उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडी सरकार जाऊन त्याच्या जागी शिवसेनेचेच एकनाथ शिंदे व भाजप यांचे सरकार आले आहे.

व्हीडीओ कॉलवर क्यूआर कोडस्कॅन करून 51 हजार लुटले
सूरज नामदे यांना बेदम मारहाण
कोल्हे कारखान्याच्या पाच शेतकरी सभासदांना ऊस शेतीचे प्रशिक्षण

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यात सत्ताबदल झाला व उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडी सरकार जाऊन त्याच्या जागी शिवसेनेचेच एकनाथ शिंदे व भाजप यांचे सरकार आले आहे. त्यामुळे या बदललेल्या राजकीय वातावरणाचे पडसाद नगर जिल्ह्याच्या राजकारणावरही उमटणार आहेत. मागील अडीच वर्षांच्या काळात राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा ज्यांना राजकीय त्रास झाला, ती मंडळी आता फॉर्मात येणार आहे. आता त्यांची चलती सुरू होणार असल्याने या सत्तेच्या माध्यमातून ते कट्टा धरून मागील अडीच वर्षांच्या राजकीय त्रासाचे उट्टे काढणार का, हाच कळीचा मुद्दा आहे.
अडीच वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अकोल्याचे उमेदवार वैभव पिचड, कोपरगावच्या स्नेहलता कोल्हे, राहुरीला शिवाजी कर्डिले, नेवाशाला बाळासाहेब मुरकुटे व कर्जत-जामखेडला प्रा. राम शिंदे हे पाच दिग्गज उमेदवार पडले. त्यानंतर लगेच राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. त्यामुळे या सरकारचे घटक असलेले अकोल्याचे नवे आमदार डॉ. किरण लहामटे, कोपरगावचे आशुतोष काळे, राहुरीला प्राजक्त तनपुरे व कर्जत-जामखेडला रोहित पवार हे राष्ट्रवादीचे चार आमदार व नेवाशात अपक्ष आणि नंतर हाती शिवबंधन बांधलेले शंकरराव गडाख हे पाचजण जोमात आले. परिणामी मागील अडीच वर्षात या पाच तालुक्यांतील राजकारण नेहमीच चर्चेत राहिले. येथील विद्यमान आमदारांनी सत्तेच्या माध्यमातून येथील पाचही माजी आमदारांना जेरीस आणले. एकीकडे सत्तेच्या माध्यमातून विकास कामे मार्गी लावता लावता दुसरीकडे माजी आमदारांची समर्थक माणसे फोडून आपलीशी करण्यासह राजकीय टीकाटिपण्णींतूनही माजींना अस्तिवहीन करण्याचा प्रयत्न केला. पण माजी आमदारही पट्टीचे राजकीय पहिलवान असल्याने त्यांनीही तोडीस तोड राजकारण रंगवले. परिणामी, तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीपैकी फक्त कर्जतलाच राष्ट्रवादीची सत्ता मिळवण्यात पवारांना यश आले. अकोल्यात लहामटेंना अपयश आले व पिचडांनी तेथे भाजपची सत्ता मिळवली तर पारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना एकहाती सत्ता आणता आली नाही. पण त्यांनी अपक्ष फोडण्याचा जुगाड करीत तेथील सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात घेतली. आता राहुरी, कोपरगाव नगरपालिका व नेवासे नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पण आता नव्या सरकारमुळे तेथील निकालाची समीकरणेही बदलण्याची शक्यता आहे.

बाहेर पडलेल्यांचे काय होणार?
मागील अडीच वर्षात या पाचही विद्यमान आमदारांनी तेथील माजी आमदारांचे समर्थक आपल्याकडे खेचून घेतले होते. नेवाशात तर भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करणारे जथ्थेच्या जथ्थे दिसत होते. याशिवाय जामखेडला सोले परिवार, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कर्जतला माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, नगर तालुक्यात काँग्रेसचे बाळासाहेब हराळ, अकोल्यात भाजपचे कैलास वाकचोरे अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात स्वतःची ओळख राखून असलेल्या अनेकांनी स्वपक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. नेवाशातील अभिजीत लुणिया यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरातांच्या जवळ जाणे पसंत केले. अजूनही अनेक राजकीय उलथापालथी जिल्ह्यात घडल्या. तेथील स्थानिक राजकारणात त्याचे चांगले-वाईट परिणामही झाले. पण आता सरकार बदलल्याने या सर्वांचे काय होणार? वर्षा-सहा महिन्यात ही मंडळी पुन्हा भाजपच्या मांडवाखाली दिसणार काय?, याचीच चर्चा आता रंगू लागली आहे.

दहा तालुक्यांवर असेल लक्ष
राज्यात नवे शिंदेशाहीचे व भाजपचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील राजकीय घडामोडींवर आता लक्ष असणार आहे. विधान परिषदेचे नवे आ. प्रा. राम शिंदे व आ. रोहित पवार यांच्या कर्जत व जामखेड तालुक्यात, राहुरीला आ. प्राजक्त तनपुरे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात, शेवगाव व पाथर्डी तालुक्यात आ. मोनिका राजळे आणि चंद्रशेखर घुले व प्रताप ढाकणे यांच्यात, अकोल्यात किरण लहामटे व वैभव पिचड आणि कोपरगावला आशुतोष काळे व स्नेहलता कोल्हे यांच्यात आणि नेवाशात शंकरराव गडाख व बाळासाहेब मुरकुटे यांच्यात भविष्यातील राजकारण कसे रंगणार, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. आता कट्टा धरून उट्टे काढले जाणार काय, याचेच जास्त कुतूहल आहे. याशिवाय जिल्ह्यातील पारंपरिक दिग्गज विरोधक शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे व संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्यातील नवा संघर्षही लक्षवेधी असणार आहे. पारनेरला शिवसेनेचा आमदार नाही व तेथील भाजपही कमी ताकदवान असल्याने निलेश लंके यांना अडचण येण्याची शक्यता कमी आहे. फक्त राज्यात आता त्यांच्या पक्षाची सत्ता नसल्याने आतापर्यंतचा त्यांच्यावरील प्रसिद्धीचा झोत काहीसा कमी होणार आहे. नगर शहरातही अशीच स्थिती असून, येथेही शिवसेना व भाजपला एकमुखी नेतृत्व नाही. त्यामुळे संग्राम जगताप यांना आता काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे कितपत आव्हान देतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. श्रीगोंद्यात बबनराव पाचपुतेंचा पगडा कायम असला तरी तेथेही राहुल जगताप, घनश्याम शेलार व राजेंद्र नागवडेंचे परंपरागत आव्हान त्यांच्यासमोर आहे व ते तसेच पुढे चालू राहणार आहे तर श्रीरामपूरला काँग्रेसचे आ. लहू कानडे व राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्यातील महाविकास आघाडीमधीलच घटक पक्षांचाच कलगीतुरा जोरात असल्याने तेेथील शिवसेना व भाजपला यात कितपत महत्व मिळते, हे पाहणेही कुतूहलाचे झाले आहे.

COMMENTS